`पाकिस्तान विरुद्धचा सामना आम्ही...`; 160 रनने जिंकल्यानंतर बटलरचं बाबरच्या संघाला चॅलेंज
World Cup 2023 Jos Buttler On England Vs Pakistan: इंग्लंडच्या संघासाठी वर्ल्ड कप 2023 ची स्पर्धा एखाद्या वाईट स्वप्नासारखी ठरली आहे. इंग्लंडला या स्पर्धेत केवळ 2 विजय मिळवता आले आहेत.
World Cup 2023 Jos Buttler On England Vs Pakistan: भारतामध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेमधील शेवटचे काही सामने शिकल्लक आहेत. मात्र या स्पर्धेमध्ये विद्यमान विजेता असलेल्या इंग्लंडची कामगिरी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. इंग्लंडच्या सुमार कामगिरीमुळे त्यांचं स्पर्धेतील आव्हान कधीच संपुष्टात आलं आहे. स्पर्धेमध्ये सलग 5 सामने पराभूत झाल्यानंतर इंग्लंडने बुधवारी नेदरलॅण्डला पराभूत केलं. इंग्लंडने नेदरलॅण्डला 160 धावांनी पराभूत केलं. इंग्लंडचा हा स्पर्धेमधील दुसराच विजय ठरला. मात्र या विजयाने इंग्लंडचा आत्मविश्वास फार वाढला असून शेवटच्या सामन्यामध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्यासाठी इंग्लिश संघ सज्ज झाला आहे. पाकिस्तानसाठी हा सामना करो या मरोचा असणार आहे.
इंग्लंडची दमदार कामगिरी
नेदरलॅण्डविरुद्धच्या सामन्यामध्ये इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवर डेव्हिड मलानने 81 धावांची खेळी केली. तर बेन स्ट्रोक्सने शतक झळकावलं. क्रिस वोक्सने खालच्या क्रमांकावर येत अर्धशतक झळकावलं. इंग्लंडच्या संघाने 339 धावांचा डोंगर उभा केला. आदिल रशीद आणि मोइन अली यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेत नेदरलॅण्डच्या संघाला 179 धावांवर तंबूत धाडलं.
स्ट्रोक्स आणि वोक्सचं कौतुक
या सामन्यातील विजयानंतर इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर, "आम्ही या विजयाची फार वाट पाहत होतो. मलानने आमच्यासाठी फार उत्तम खेळी केली. बेन स्ट्रोक्स आणि क्रिस वोक्सने जी पार्टनरशीप केली ती खरोखरच कौतुकास्पद आहे. एखाद्याने उभं राहावं आणि सारं काही संभाळावं असं तुम्हाला वाटत असतं तेव्हा बेन स्ट्रोक्सच समोर येतो आणि सारं काही सावरतो. स्ट्रोक्स आणि वोक्स यांनी जी पार्टनरशीप केली ती फार संयमी होती. आम्ही चांगली धावसंख्या उभारली होती. ज्यांनी यावर फलंदाजी केली त्यांनी खेळपट्टी चांगली असल्याचं म्हटलं," म्हणाला.
नक्की वाचा >> New Zealand शेवटची मॅच न खेळताच वर्ल्ड कपमधून बाहेर? पाकिस्तानसाठी Good News
पाकिस्तानला थेट आव्हान
पाकिस्तानविरुद्धच्या पुढील सामन्याबद्दल बोलताना बटलरने आपली भूमिका स्पष्ट केली. पाकिस्तानविरुद्धचा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही जिंकणारच असा निर्धार बटरलने बोलून दाखवला आहे. स्पर्धेचा शेवटचा सामना जिंकण्याच्या दृष्टीनेच आम्ही मैदानात उतरु असंही बटरलने स्पष्ट केलं आहे. "पाकिस्तानविरुद्ध होणारा सामना आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. आम्हाला या सामन्यात मोठ्या विजयाची आवश्यकता आहे. आम्हाला या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीची निराशा हाती लागली आहे ती विसरण्यासाठी स्पर्धा विजयासहीत संपवण्याचा आमचा मानस आहे. शेवटच्या सामन्यातील विजय हा आमच्यासाठी फारच महत्त्वाचा आहे," असं बटलरने स्पष्ट केलं आहे.
पाकिस्तानची स्थिती काय?
पाकिस्तानविरुद्धचा इंग्लंडचा साखळीफेरीतील शेवटचा सामना शनिवारी खेळवला जाणार आहे. पाकिस्तानचा नेट रन रेट +0.036 इतका आहे. न्यूझीलंडचा नेट रन रेट +0.398 इतका असून या दोन्ही संघांमध्ये चौथ्या स्थानासाठी चुरस आहे. न्यूझीलंडचा साखळीफेरीतील सामना आज श्रीलंकेविरुद्ध होणार असून त्यांनाही हा सामना जिंकणं अनिवार्य आहे. बटलरने दिलेल्या आव्हानामुळे पाकिस्तानला त्यांचा शेवटचा सामना फारसा सहज जिंकता येणार नाही हे उघड आहे. त्यामुळेच बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाची धडधड बटरलच्या विधानानंतर नक्कीच वाढली असणार यात शंका नाही.
वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.