वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघ अपेक्षित कामगिरी करु शकलेला नाही. याउलट लाजिरवण्या कामगिरीमुळे पाकिस्तान संघाला चहूबाजूंनी टीका सहन करावी लागत आहे. आपली छापही पाडू न शकलेल्या संघाच्या कामगिरीमुळे बाबर आझमचं कर्णधारपद धोक्यात असल्याची चर्चा आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डातील वरिष्ठ सदस्य यासंबंधी विचारही करत असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान क्रिकेट बोर्डाचे माजी प्रमुख रमीज राजा यांनी कोलकातामध्ये इंग्लंडविरोधातील सामन्याआधी आपण बाबर आझमची भेट घेतल्याचं सांगितलं आहे. बाबर आझम यावेळी फार उत्साही दिसत नव्हता असा खुलासा रमीज राजा यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मी काल बाबरची भेट घेतली. तो फारच निराश दिसत होता. खेळाडू सतत मीडियाच्या नजरेत आहेत. गोष्टी फारच निर्दयी असू शकतात. त्याची यापुढे संघाचं नेतृत्व करण्याची इच्छा आहे की नाही याची मला कल्पना नाही. एकदा पाकिस्तानात पोहोचल्यानंतर तो बहुतेक यासंबंधी निर्णय घेऊ शकतो. बाबर आझमने संघाचं नेतृत्व करावं यापेक्षा संघाची कशा नेतृत्वाची अपेक्षा आहे हे महत्त्वाचं आहे. नेमकी यंत्रणा काय आहे, त्यांचा नेमका दृष्टीकोन काय आहे? नेमक्या चुका काय आहेत? कोणत्या गोष्टी सध्या लागू होत नाहीत," असं रमीज राजा म्हणाले आहेत.


पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, बाबर आझमला त्याच्या संघातील सहकाऱ्यांनी कर्णधारपदाचा राजीनामा न देण्याचा सल्ला दिला आहे. पण बाबर आझमने पीसीबीचे प्रमुख झका अश्रफ यांच्या अध्यक्षतेखालील पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे त्याच्या भविष्याचा निर्णय सोपवला आहे. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघाने 5 सामने जिंकत 10 गुण मिळवले आहेत. पण उपांत्य फेरीतील पात्रता गमावली आहे. ज्यामुळे नेतृत्वात बदल करण्याची मागणी करत माजी खेळाडू टीका करत आहेत.


"बाबरने आपल्या संघातील सहकाऱ्यांशी संवाद साधला आहे. यामधील अनेकांनी बाबरला राजीनामा न देण्याचा सल्ला दिला आहे. वर्ल्डकपमधील सेमी-फायनलमध्ये पात्र होण्यास असमर्थ ठरल्यानंतर बाबर आझम संघासह देशात परतल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. पण तो स्वत:हून माघार घेणार नाही," असं रमीज राजा म्हणाले आहेत.


बाबर आझमने कर्णधारपद सोडलं तर संघाकडे इमाम उल-हक, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ असे अनेक पर्याय आहेत. पण संघात बाबर आझमला मोठा पाठिंबा आहे. गतवर्षी जेव्हा बाबर आझमला कसोटी संघाच्या कर्णधारपदावरुन काढण्याची चर्चा होती तेव्हा सोशल मीडियावर "Sochna Bhi Mana Hai" हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये होता. 


वर्ल्डकपनंतर पाकिस्तान संघ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन मोठ्या दौऱ्यांवर असणार आहे. या दौऱ्यांमध्ये आपणच संघाचं नेतृत्व करावं अशी बाबर आझमची इच्छा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबर आझम आपण कर्णधारपदी राहावं की नाही हा निर्णय पूर्णपणे पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर सोडणार आहे.