एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करण्यासाठी रोहित शर्मा हा आदर्श करमार असल्याचं मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंगने मांडलं आहे. या वर्ल्डकपसह भारताकडे तिसऱ्यांदा विश्वविजेता होण्याची, तसंच आपल्या घरच्या मैदानावर दुसऱ्यांदा ही कामगिरी करण्याची संधी आहे. याआधी 2011 मध्ये भारतात वर्ल्डकपचं आयोजन करण्यात आलं होतं. धोनीच्या नेतृत्वातील संघाने हा वर्ल्डकप जिंकला होता. सध्या रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखत पराभव केल्यानंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचाही मोठा पराभव करत भारतीय संघ सध्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"रोहित शर्मा फार शांत आहे. तो जे काही करतो ते फार शांत राहून, संयमपणे करतो. तो ज्याप्रकारे खेळतो त्यातूनही हे दिसतं. तो एक उत्तम फलंदाजही आहे. तसंच मैदानाबाहेर आणि मैदानात दोन्हीकडेही तो सारखाच असतो," असं रिकी पाँटिंगने म्हटलं आहे. रोहित शर्माने डिसेंबर 2021 मध्ये विराट कोहलीकडून काढण्यात आलेलं कर्णधारपद स्विकारलं. 


रिकी पाँटिंगच्या मते रोहित शर्मा हा कर्णधारपदासाठी अगदी योग्य असल्याचं म्हटलं आहे. तसंच यामुळे विराट कोहली त्याच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करु शकतो असं सांगितलं आहे. "विराटसारखा कोणीतरी, जो मनाने फार विचार करतो आणि कदाचित चाहत्यांचं ऐकतो, त्यांच्याशी खेळतो. अशा व्यक्तीमत्वासाठी हे कदाचित थोडं कठीण ठरु शकतं," असं ऑस्ट्रेलियाचा दोन वेळचा वर्ल्डकप विजेता कर्णधार म्हणाला.


"पण रोहितला याचा फरत पडणार नाही. तो एक उत्कृष्ट खेळाडू असून मागील बऱ्याच काळपासून त्याने ही उपाधी कायम ठेवली आहे. त्याने भारतासाठी नेतृत्व करताना उत्तम कामगिरी केली आहे," असं रिकी पाँटिंगने सांगितलं आहे. भारताने 2011 मध्ये शेवटचा वर्ल्डकप जिंकला आहे. त्यावेळी भारत, श्रीलंका आणि बांगलादेश यांनी संयुक्तपणे या वर्ल्डकपचं आयोजन केलं होतं. 


घऱच्या मैदानावर आपल्या चाहत्यांसमोर खेळण्याचं दडपण भारतीय खेळाडूंवर असणं साहिजक आहे. पण रोहित शर्मा यासाठी उत्तम व्यक्ती असल्याचं रिकी पाँटिंगचं म्हणणं आहे. "कोणत्याही स्तरावर भारतीय संघावर दबाव येणार नाही, त्यांच्यावर परिणाम होणार नाही असं आपण म्हणू शकत नाही. स्पर्धा जसजशी पुढे सरकेल तसा त्यांच्यावर नक्की दबाव येईल. पण रोहित शर्मा या दबावाचा सामना करण्यासाठी सर्वोत्तम आणि कदाचित एकमेव खेळाडू आहे," असं रिकी पाँटिंगने सांगितलं. 


रिकी पाँटिंगने यावेळी भारताकडे सर्वोत्तम संघ असून, त्यांनी प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिल्याचं म्हटलं आहे. "मी सुरुवातीपासून सांगत आलो आहे की, हा एक सर्वोत्तम संघ आहे. त्यांच्याकडे फार गुणी संघ आहे," असं तो म्हणाला.


"जलगदती, फिरकी गोलंदाजांसह आघाडी आणि मधल्या फळीतील फलंदाज अशाप्रकारे त्यांना सर्व गोष्टींची काळजी घेतली आहे. त्यांचा पराभव कऱणं कठीण जाणार आहे. पण ते दबावात कसं खेळतात हेदेखील पाहावं लागेल," असं रिकी पाँटिंगने सांगितलं. भारताचा पुढील सामना बांगलादेशशी होणार आहे. पुण्यात गुरुवारी हा सामना होणार आहे.