भारतीय क्रिकेट संघाचा माजी आघाडीचा फलंदाज गौतम गंभीरने सध्याच्या भारतीय आणि पाकिस्तान संघात मोठा फरक असल्याचं म्हटलं आहे. तसंच सध्या रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाचं निर्विवाद वर्चस्व हे उपखंडातील क्रिकेटसाठी चांगलं नसल्याचं म्हटलं आहे. एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा मोठा पराभव केल्यानतर गौतम गंभीरने हे विधान केलं आहे. भारतीय संघ गेल्या अनेक काळापासून पाकिस्तानवर भारी पडत असल्याकडे गंभीरने लक्ष वेधलं. तसंच दोन्ही संघांमध्ये द्विपक्षीय मालिका सुरु झाल्यास चांगली स्पर्धा होईल असं मत मांडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"वर्चस्व गाजवलं जात असतानाच इतका मोठा पराभव. तेदेखील तुम्ही पाकिस्तानविरोधात खेळताना केला आहे. जर तुम्ही निकाल पाहिला तर पाकिस्तानने याआधी अनेकदा अशाप्रकारे भारताचा मोठा पराभव केला आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये भारताने वर्चस्व गाजवलं आहे. उपखंडीय क्रिकेटसाठी हे फार वाईट आहे. आम्ही नेहमी म्हणत होतो की, जर भारत आणि पाकिस्तानमध्ये मालिका झाली तर स्पर्धा निर्माण होईल. पण भारत-पाकिस्तान सामना अजिबात स्पर्धात्मक होणार नाही, कारण दोन्ही संघांमध्ये फार मोठा फरक आहे," असं गौतम गंभीरने स्टार स्पोर्टशी बोलताना सांगितलं आहे.


गौतम गंभीरने यावेळी पाकिस्तानविरोधात अत्यंत शिस्तबद्ध गोलंदाजी करणाऱ्या जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादवचं कौतुक केलं. तसंच पाकिस्तानी गोलंदाजांसह होणाऱ्या तुलनेवरही भाष्य केलं. 


"जर एखाद्या कर्णधाराकडे जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव असेल तर मग त्याच्याकडे फार मोठी संधी आहे. 50 पैकी 20 ओव्हर्स चेंडू अशा गोलंदाजांकडे असेल जे तुम्हाला कधीही विकेट मिळवून देऊ शकतात. तुम्ही जसप्रीत बुमराह आणि शाहीन आफ्रिदीची तुलना करत आहात. जसप्रीत बुमराहने दुपारी 2 वाजता उन्हात आपली पहिली ओव्हर टाकली तरीही पहिल्या चार ओव्हरमध्ये मोजक्या धावा दिल्या," असं कौतुक गौतम गंभीरने केलं. 


ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा पराभव करत भारतीय संघ सेमी-फायनलसाठी एक प्रबळ दावेदार ठरत आहे. 


अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये झालेल्या सामन्यात भारताने टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान प्रथम फलंदाजी करताना पूर्ण 50 ओव्हरही खेळू शकला नाही. 155 धावांवर 2 बाद नंतर पाकिस्तान संघ 191 धावांवर गारद झाला. भारताने अत्यंत सहजपणे या लक्ष्याचा पाठलाग केला. कर्णधार रोहित शर्माने 86 धावांची जबरदस्त खेळी करत भारताच्या विजयाचा पाया रोवला. भारताने 7 गडी राखून हा सामना जिंकला.