`रोहित शर्माने 30 पेक्षा अधिक शतकं ठोकली असली तरी...`, भारताच्या दिग्गज खेळाडूने केलं विराटचं जाहीर कौतुक
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 वं शतक ठोकत संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. क्रिकेटच्या भविष्यात एखादा फलंदाज या रेकॉर्डच्या जवळपास तरी येईल का याबाबत शंकाच आहे.
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 वं शतक ठोकत संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. भविष्यात कोणताही फलंदाज या रेकॉर्डच्या जवळपासही पोहोचू शकणार नाही असा विश्वास भारताचे दिग्गज फलंदाज गुंडप्पा विश्वनाथ यांनी व्यक्त केला आहे. विराट कोहलीने सेमी-फायनल सामन्यात 117 धावा करत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा रेकॉर्ड मोडला आहे. "मी याआधी म्हणालो होतो की, जर कोणी सचिनच्या शतकांच्या रेकॉर्डच्या जवळ येऊ शकत असेल तर तो कोहली आहे. पण तो हा रेकॉर्ड मोडेल असं मला वाटलं नव्हतं," असं विश्वनाथ पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहेत.
"प्रत्येकजण त्याच्या शतकांबद्दल बोलत आहे, पण तो ज्याप्रकारे 70, 80 धावा करतो ते कौतुकास्पद आहे. आपल्या सातत्यामुळेच तो 50 पेक्षा अधिक धावा करतो. ज्याप्रकारे तो क्रिकेट खेळतो, त्याच्यात अजून फार क्रिकेट शिल्लक आहे," असं विश्वनाथ यांनी सांगितलं आहे.
"या रेकॉर्डच्या जवळपास येणारे फार कमी फलंदाज आहे. रोहित शर्माची 30 पेक्षा जास्त शतकं असली तरी त्याच्यासाठी अद्याप मोठा प्रवास आहे. पण इतर कोणी जवळ असल्याचं मला दिसत नाही. त्याने सचिनपेक्षा एक शतक जास्त करत एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे," असं विश्वनाथ म्हणाले.
विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 शतकं ठोकली असताना, कसोटीमध्ये त्याच्या नावे 29 आणि टी20 मध्ये 1 शतक आहे. एकूण त्याच्या नावे 80 शतकं आहेत. सेमी-फायनल सामन्यात विराटने एकाच वर्ल्डकप स्पर्धेत 700 धावा करण्याचा रेकॉर्डही मोडला आहे.
पुढे ते म्हणाले, "मी त्याची सचिनशी तुलना करणार नाही. कारण ते दोघेही फार वेगळे क्रिकेटर आहेत. तुलना करु शकत नसलो तरी दोघं महान खेळाडू आहेत. सर्वात चांगली बाब म्हणजे त्यांना आपण काय करत आहोत याची माहिती आहे. सचिनला आपण काय करत आहोत याची जाण होती आणि विराट सांगतो सचिन माझा गुरु आहे. तोही त्याच्या मार्गावर चालत आहे." कोहलीची फलंदाजी पाहणं म्हणजे एक पर्वणीच असल्याचं कौतुक त्यांनी केलं आहे.
सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 आणि कसोटीत 51 शतकं केली असून 100 शतकं ठोकणारा आतापर्यंतचा एकमेव फलंदाज आहे. विराट कोहली सचिन तेंडुलकरचा हा रेकॉर्डही मोडेल का? असं विचारण्यात आलं असता विश्वनाथ म्हणाले "आपण किती कसोटी सामने खेळतो यावर ते अवलंबून आहे. आता आपण दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरोधात खेळणार आहोत. तुम्ही प्रत्येक सामन्यात शतक करु शकत नाही. पण विराटमध्ये रेकॉर्ड मोडण्याची क्षमता नक्कीच आहे".