World Cup आधी गंभीरची मोठी भविष्यवाणी; पाकिस्तानचा उल्लेख करत दिला इशारा, म्हणाला `बाबर आझम...`
वर्ल्डकपसाठी आता अवघे काही दिवस राहिले असून, यादरम्यान वेगवेगळे दावे केले जात आहेत. माजी भारतीय क्रिकेटर गौतम गंभीरनेही पाकिस्तानचा उल्लेख करत मोठी भविष्यवाणी केली आहे.
क्रिकेट वर्ल्डकप सुरु होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. वर्ल्डकप जिंकण्यासाठी सध्या सर्व संघ सराव करत असून, घाम गाळत आहेत. यावर्षी भारताकडे वर्ल्कडपचं यजमानपद आहे. भारतात वर्ल्डकप होणार असल्याने भारतीय संघाकडे वर्ल्डकप जिंकण्याची सुवर्णसंधी असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान या स्पर्धेत काही खेळाडूंच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, जोस बटरल, बाबर आझम यांचा समावेश आहे. हे फलंदाज नवे रेकॉर्ड रचत एकमेकांना कडवी झुंज देऊ शकतात. त्यातच, वर्ल्डकप कोण जिंकेल? कोणता खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करेल? यासंबंधी दावे केले जात असताना, काही खेळाडू भविष्यवाणीही करत आहेत. त्यातच भारताच्या 2011 वर्ल्डकप विजेच्या संघाचा खेळाडू गौतम गंभीरनेही पाकिस्तानचा उल्लेख करत मोठी भविष्यवाणी केली आहे.
या वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा आणि बाबर आझम चांगली कामगिरी करतील असा विश्वास गौतम गंभीरने व्यक्त केला आहे. इतकंच नाही, तर बाबर आझम या वर्ल्डकपमध्ये 3 ते 4 शतकं ठोकेल असं असं गंभीरचं म्हणणं आहे. रोहित शर्माने 2019 वर्ल्डकपमध्ये 5 शतकं ठोकली होती.
"रोहित शर्माकडे फार चांगली क्षमता आहे. त्यातच यावर्षी वर्ल्डकप भारतात होणार आहे. आपल्याला रोहित शर्माचा भारतातील रेकॉर्ड तर माहिती आहे. त्याने तीन किंवा चार द्विशतकं ठोकली आहेत. त्यामुळे तो आगामी वर्ल्डकपची फार आतुरतेने वाट पाहत असेल आणि तो जिंकावा या प्रयत्नात असेल," असं गौतम गंभीरने स्टार स्पोर्ट्शी संवाद साधताना म्हटलं.
गौतम गंभीरने यावेळी बाबर आझमचंही कौतुक केलं आहे. बाबर आझम 3 ते 4 शतकं ठोकेल असा विश्वास गौतम गंभीरने व्यक्त केला आहे. "बाबर आझमकडे ज्या प्रकारची शैली आहे ती पाहता तो या वर्ल्डकपमध्ये तीन ते चार शतकं ठोकेल," असं गौतम गंभीरने सांगितलं.
न्यूझीलंडविरोधात झालेल्या सराव सामन्यात बाबर आझम चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचं दिसलं. पाकिस्तानच्या कर्णधाराने या सामन्यात 80 धावा ठोकल्या आणि संघाची धावसंख्या 300 पार पोहोचवली. पण हा सामना न्यूझीलंडने जिंकला.