`..हाच रोहित आणि इतर कर्णधारांमधला फरक`; गंभीरने सांगितला 2023 अन् 2019 च्या संघातला फरक
Gautam Gambhir On Rohit Sharma Led India: 2019 आणि 2023 च्या वर्ल्ड कपच्या संघामध्ये काय फरक आहे याबद्दल भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला प्रश्न विचारण्यात आला.
Gautam Gambhir On Rohit Sharma Led India: भारतीय संघ आज वानखेडेच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध सेमी-फायलन खेळणार आहे. या सामन्यासंदर्भात क्रिकेट विश्वात चर्चा सुरु असतानाच 2011 च्या विश्वविजेत्या संघाचा भाग असलेला माजी सलामीवीर गौतम गंभीरने सध्या वर्ल्ड कप खेळत असलेली टीम इंडिया आणि 2019 च्या पर्वातील संघाची तुलना केली आहे. गौतम गंभीरने एकीकडे रोहित शर्माचं कौतुक केलं असतानाच दुसरीकडे अप्रत्यक्षपणे माजी कर्णधार विराट कोहलीला टोमणा मारला आहे.
दोन्ही संघाची तुलना
भारतीय संघ 2019 च्या वर्ल्ड कपमध्येही साखळी फेरीनंतर आताप्रमाणेच पहिल्या क्रमाकांवर होता. भारताने यंदाच्या वर्ल्ड कपमधील साखळी फेरीतील सर्वच्या सर्व 9 सामने जिंकले आहेत. अशाचप्रकारे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघानेही ग्रुप स्टेजला 2019 मध्ये अव्वल स्थान पटकावलं होतं. मात्र सेमीफायलनमध्ये न्यूझीलंडने भारताला पराभवाचा धक्का दिला होती. आज पुन्हा भारताची गाठ न्यूझीलंडशीच होणार आहे. याच पार्श्वभूमीवर गौतम गंभीरने 2019 चा आणि 2023 चा भारतीय संघ अशी तुलना केली आहे.
पाच वेळा ट्रॉफी जिंकली
'स्टार स्पोर्ट्स'शी बोलताना गंभीरने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ हा स्थिर असल्याचं म्हटलं आहे. याउलट विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील 2019 मधील संघामध्ये वारंवार बदल केले जात होते, असंही गंभीरने नमूद केलं. त्यामुळेच संघात खेळाडूंना सुरक्षित वाटणं आणि ड्रेसिंग रुममधील वातावरण खेळतं ठेवण्याचं श्रेय कर्णधाराला दिलं पाहिजे असं गंभीरचं म्हणमं आहे. गंभीरने आयपीएलमधील रोहित शर्माच्या विक्रमाचा उल्लेख करताना त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा ट्रॉफी जिंकली असल्याचं सांगितलं. मात्र रोहितचं नेतृत्व हे आखडेवारीहूनही अधिक असल्याचं गंभीर म्हणाला.
त्याने ड्रेसिंग रुम अधिक सुरक्षित केलं
"2019 आणि 2023 मध्ये फार काही बदललेलं नाही. 2019 मध्ये संघात फार बदल होत होते. त्या तुलनेमध्ये 2023 ला असं पाहायला मिळालं नाही. एक उत्तम कर्णधार आणि नेतृत्व सुरक्षेची भावना निर्माण करतो. त्यामुळे ड्रेसिंग रुममध्ये अधिक सुरक्षित वातावरण निर्माण होतं. हे केवळ त्याच्यासाठीचं होतं असं नाही तर संघातील इतर 14 लोकांबरोबरही असं होतं. रोहितने हे करुन दाखवलं आहे. त्यामुळेच त्याच्या नावावर 5 आयपीएल ट्रॉफी आहेत. याच कारणामुळे त्याचा अंतरराष्ट्रीय स्तरावरील सामने जिंकण्याची सरासरी अधिक आहे. तुम्ही ट्रॉफी आणि आकडेवारीचा विचार केला तर तो सर्वोत्तम आहे. मात्र त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्याने ड्रेसिंग रुम हा अधिक सुरक्षित केला आहे सर्वच खेळाडूंसाठी," असं गंभीरने म्हटलं आहे.
रोहित आणि इतर कर्णधारांमधील फरक
"जेव्हा कर्णधार सामन्यानंतर बोलताना त्याचा त्याच्या खेळाडूंवर विश्वास असून तो दिर्घकाळ त्यांच्या पाठीशी राहिल असं सांगतो तेव्हा तुमचा कर्णधार तुमच्या पाठीशी आहे असा विश्वास खेळाडूंमध्ये निर्माण होतो. हाच रोहित शर्मा आणि यापूर्वी भारताचं नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांमधील महत्त्वाचा फरक आहे," असं गंभीरने म्हटलं आहे. या ठिकाणी गंभीरने कोहलीवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.