वर्ल्डकप स्पर्धेच्या निमित्ताने मैदानाबाहेर संघांसह खेळाडूंच्या वैयक्तिक खेळीची तुलना केली जात आहे. अनेक माजी खेळाडू सोशल मीडिया तसंच वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रमात सहभागी होत सामन्याचं निरीक्षण करत आपली मतं मांडत आहेत. पण यादरम्यान काही विधानं संबंधितांनी केली नसतानाही त्यांच्या नावे व्हायरल होत आहेत. असंच एक विधान भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरच्या नावे चर्चेत आहे. ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने 201 धावांची तुफानी खेळी केल्यानंतर गौतम गंभीरने विराट कोहली असता तर 195 धावांनंतर एक एक धाव घेत राहिला असता अशी टीका केल्याचं यात सांगण्यात आलं होतं. पण आपण हे विधान केलंच नसल्याने गौतम गंभीर संतापला असून, एक्सवर पोस्ट शेअर करत नाराजी जाहीर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. नुकतंच विराट कोहलीने 49 वं शतक ठोकलं असून एकीकडे कौतुकाचा वर्षाव होत असताना, दुसरीकडे मात्र त्याच्या धीम्या खेळीवरुन टीका होत आहे. विराट कोहली शतकासाठी खेळतो असा एक टीकेचा सूर आहे. न्यूझीलंडविरोधातील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना त्याने शेवटच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी न केल्याने तो शतकासाठी खेळत होता अशी टीका झाली. ही टीका करणाऱ्यांमध्ये गौतम गंभीरचाही समावेश होता.


गौतम गंभीरने विराट कोहलीवर टीका करताना म्हटलं होतं की, "मला वाटतं विराटने थोडं आक्रमक खेळायला हवं होतं. मला वाटतं शेवटच्या 5 ते 6 ओव्हर्समध्ये तो धीम्या गतीने खेळला. कदाचित शतकाजवळ असल्याने त्याने हे केलं. पण संघाने चांगली धावसंख्या उभी केली होती. जर ही फलंदाजांची खेळपट्टी असती तर कदाचित भारताचं नुकसान झालं असतं".


गंभीरच्या नावे खोटं वृत्त


पण ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरोधात 201 धावांची खेळी केल्यानंतर गौतम गंभीरच्या नावे एक विधान व्हायरल झालं होतं, जे त्याने केलंच नव्हतं. जर विराट असता तर 195 नंतर एक एक धावा घेत राहिला असता असं गंभीरने म्हटल्याचं यात सांगण्यात आलं होतं. पण गौतम गंभीरने हे विधान केलंच नव्हतं.


गौतम गंभीर संतापला


गौतम गंभीरने एक्सवर पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे. "काय बकवास आहे. मी कधी जाहीरपणे हे विधान केलं. सर्व व्हेरिफाइड हँडलर्सनी आपली सूत्रं जाहीर करावीत अन्यथा माफी मागावी," असं गौतम गंभीरने म्हटलं आहे.



दरम्यान भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असून आता फक्त नेदरलँडविरोधातील सामना शिल्लक आहे. रविवारी हा सामना होणार असून, भारताने आधीच सेमी-फायलनमधील आपली जागा निश्चित केली आहे. चौथ्या क्रमांकासाठी पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात चुरस असून, त्यानंतरच भारत सेमी-फायनलमध्ये कोणाशी भिडणार हे स्पष्ट होणार आहे.