`140 कोटी भारतीयांना शतक नकोय, त्यांना...`; गंभीरचा खोचक टोमणा! रोख कुणाच्या दिशेनं?
World Cup 2023 Gautam Gambhir Dig At Virat Kohli: विराट कोहली हा भारतासाठी वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. असं असतानाही गंभीरने त्याच्यावर निशाणा साधला आहे.
World Cup 2023 Gautam Gambhir Dig At Virat Kohli: भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर हा त्याच्या रोखठोक मतांसाठी प्रसिद्ध आहे. अनेक चर्चासत्रांबरोबरच वृत्तवाहिन्यांवर आपली मतं मांडताना गौतम गंभीरने केलेली विधानं लक्ष वेधून घेतात. कधी या विधानांवरुन वाद होतात तर कधी गंभीरला ट्रोल केलं जातं. मात्र याचा गंभीरला फारसा फरक पडत नाही. असेच एक मत आता त्याने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या विराट कोहलीबद्दल व्यक्त केलं आहे. अर्थात गंभीरने थेट कोहलीचा उल्लेख टाळला असला तरी कर्णधार रोहित शर्माच्या फलंदाजीच्या शैलीचं कौतुक करताना 'वैयक्तिक विक्रमांचा विचार रोहितने केला असता तर..' असं म्हणत सूचक विधान केलं आहे.
रोहितचा आक्रमक पवित्रा
फलंदाजीला सुरुवात करताना रोहित शर्माचा आक्रमक पवित्राही भारतासाठी फायद्याचा ठरत असून याचंही गंभीरने कौतुक केलं. रोहित शर्माच्या या आक्रमकपणाचा फायदा भारताला होताना दिसत आहे. रोहित शर्माच्या आक्रमक पवित्र्यामुळे विरोधी संघाचे गोलंदाज ढेपाळून जातात. रोहित शर्माने शतकांचा विचार केला असता तर त्याला ते अशक्य नव्हतं पण तो नियोजित पद्धतीने आक्रमकपणे खेळतो आणि वैयक्तिक विक्रमांऐवजी संघाच्या विजयाला प्राधान्य देतो, असं गौतम गंभीर म्हणाला.
रोहितवर कौतुकाचा वर्षाव
"त्याने त्याची धोरणं निश्चित करुन ठेवली आहेत कारण त्याला संघाकडूनही अशीच अपेक्षा आहे. आपल्याला जे संघाकडून जे हवं आहे त्याचं उदाहरण तो त्याच्या स्वत:च्या कामगिरीमधून देत आहे. असं नेतृत्व असेल तर संपूर्ण संघ आपल्या कर्णधाराच्या पावलावर पाऊल टाकत उत्तम कामगिरी करतो," असं रोहित शर्माचं कौतुक करताना गौतम गंभीरने म्हटलं आहे.
अप्रत्यक्षपणे विराटवर साधला निशाणा
पुढे बोलताना गौतम गंभीरने, "मागील काही वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ कायमच आक्रमकपणे खेळण्यासंदर्भात चर्चा करताना दिसतो. पण स्पर्धेच्या मध्यापर्यंत संघाची इच्छाशक्ती संपून जाते. मात्र रोहित जे बोलला ते कृतीमधून करुन दाखवत आहे. तो आकडेवारीच्या प्रेमात पडलेला नाही. वैयक्तिक विक्रमांचा विचार रोहितने केला असता तर त्याला यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये आरामात 3 ते 4 शतकं झळकावता आली असती. हे त्याला सहज शक्य होतं. 140 कोटी भारतीयांना शतक किंवा 5 विकेट्स नको आहेत. त्याऐवजी त्यांना वर्ल्ड कप हवा आहे असेच रोहित शर्माचे मत आहे," असं म्हणत गंभीरने अप्रत्यक्षपणे विराट कोहलीवर निशाणा साधला आहे.
विराटवर झाली स्वार्थी असल्याची टीका
विराट कोहलीने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पुण्यामधील बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात आपलं पहिलं शतकं झळकावलं. विराटने अगदी योग्यपद्धतीने विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा आणि आपल्या शतकासाठी आवश्यक असलेल्या धावांचा मेळ साधत शतक झळकावून विजय मिळवून दिलेला. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यामध्येही विराटने असाच प्रयत्न केला मात्र तो 95 धावांवर बाद झाला. यानंतर सोशल मीडियावर विराट कोहली स्वार्थी असल्याचा ट्रेण्डही व्हायरल झाला होता. विराटने 9 सामन्यांमध्ये 594 धावा केल्या आहेत.