World Cup Ind vs Ban : विश्वचषक 2023 च्या (World Cup 2023) 17व्या सामन्यात भारताने बांगलादेशचा (IND vs BAN) सात गडी राखून पराभव केला होता. बांगलादेशला नमवून भारताने विश्वचषक स्पर्धेत सलग चौथा विजय मिळवला आहे. या सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावून भारताचा विजय सोपा केला. या सामन्यात अनेक रोमांचक क्षण पाहायला मिळाले. पण हा सामना संपल्यानंतर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्याने प्रत्येक क्रिकेट चाहत्याला अस्वस्थ केले आहे. या सामन्यानंतर बांगलादेशच्या एका चाहत्यासोबत (Shoaib Ali Bukhari Harassed) गैरवर्तणूक करण्यात आली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

19 ऑक्टोबर रोजी पुण्यात खेळल्या गेलेल्या भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही भारतीय प्रेक्षक बांगलादेशी क्रिकेट चाहत्याला अपमानास्पद वागणूक देत आहेत. भारतीय प्रेक्षकांच्या वागण्यावर बांगलादेशी क्रिकेट चाहते नाराज असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. बांगलादेशच्या पराभवानंतर भारतीय प्रेक्षकांनी बांगलादेशी प्रेक्षकांशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. बांगलादेश क्रिकेट संघाचा सर्वात मोठा चाहता असलेल्या सुपरफॅन शोएब अली बुखारीला त्रास दिला गेला.


सामन्यादरम्यान शोएब एक वाघ घेऊन वावरत असतो. भारतीय प्रेक्षकांनी त्याचा 'वाघ' नुसताच घेतला नाही तर तो फाडून टाकल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यामुळे शोएब खूप नाराज दिसत होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, भारतीय चाहत्यांच्या या कृतीमुळे सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. मात्र बांगलादेशचा सुपरफॅन शोएब अलीला त्रास झाल्यामुळे भारतीय चाहत्यांच्या एका गटाने त्याची माफी मागितली आहे.


 



शोएब अलीनेही हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्याने भारतीय क्रिकेट रसिकांच्या अशा वागणुकीबद्दल आश्चर्य व्यक्त केले आणि सज्जनांचा खेळ म्हणून क्रिकेटची भावना टिकवून ठेवण्यावर भर दिला. त्याने सामन्यांदरम्यान एकमेकांना आदर देण्याचे आवाहन केले आहे.


दरम्यान, यावेळी शोएब अली बुखारीने रोहित शर्माचे खूप कौतुक केले. शोएब अली बुखारीच्या म्हणण्यानुसार, तो पुणे स्टेडियमबाहेर एकटाच त्याच्या मित्रांची वाट पाहत होता. त्यावेळी, बांगलादेशी संघ मैदानात सराव करत होता. तेवढ्यात मी पाहिले की एक निळ्या रंगाची कार आली, भारताचा कर्णधार रोहित शर्मा गाडी चालवत होता. मी रोहित शर्माचे नाव घेतले. यानंतर रोहित शर्माने गाडी थांबवली आणि तो माझ्याशी बोलला. रोहित शर्मा एक महान व्यक्ती आहे, म्हणूनच मी त्याचा मोठा चाहता आहे, असे शोएब म्हणाला.