भारताच्या विजयानंतर इस्रायलने उडवली पाकची खिल्ली! म्हणाले, `पाकिस्तानला हमासच्या दहशतवाद्यांना...`
India Beat Pakistan Israel Slams Pakistan: भारताने पाकिस्तानचा 7 विकेट्स राखून पराभव केला. जवळपास 20 षटकं राखून भारताने मोठा विजय मिळवत पॉइण्ट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतल्यानंतर इस्रायलने पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे.
India Beat Pakistan Israel Slams Pakistan: खेळांच्या माध्यामतून राजकीय तसेच इतर सर्व मतभेद दूर होतात असं म्हटलं जातं. मात्र सध्या सुरु असलेल्या क्रिकेट वर्ल्ड कप 2023 मध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना याचा विसर पडल्याचं चित्र दिसत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर शतक झळकावणाऱ्या मोहम्मद रिझवानने आपलं शतक गाझामधील लोकांना समर्पित केलं आहे. मात्र यावरुन मोठा वाद निर्माण झाला पण रिझवानविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. असं असतानाच आता भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा दारुण पराभव झाल्यानंतर इस्रायलने पाकिस्तानी संघाची खिल्ली उडवली आहे. भारताच्या विजयावर सामाधान व्यक्त करताना पाकिस्तानचा पराभव झाल्याने त्यांना न मिळालेला विजय हमासच्या दहशतवाद्यांना समर्पित करता आला नाही असा खोचक टोला इस्रायलने लगावला आहे.
नेमका संदर्भ काय?
पाकिस्तान आणि श्रीलंकेदरम्यानच्या सामन्यामध्ये 345 धावांचा पाठलाग पाकिस्तानने यशस्वीपणे केला. 6 विकेट्स आणि 10 चेंडू शिल्लक असतानाच पाकिस्तानने 345 धावा करत सामना खिशात घातला. या सामन्यात मोहम्मद रिझवान 131 धावा करुन नाबाद राहिला. सामना जिंकल्यानंतर मोहम्मद रिझवानने, "हा विजय गाझामधील बंधू-भगिनींसाठी समर्पित करतो," असं ट्वीट केलं होतं.
नक्की पाहा >> हॉलिवूड अभिनेत्रींनाही लाजवतील इस्रायलच्या महिला सैनिक!; हे फोटो पाहून थक्क व्हाल
भारत जिंकल्यानंतर इस्रायलने काय म्हटलं?
इस्रायलचे भारतामधील राजदूत नाओर गिलॉन यांनी त्यांच्या ट्वीटर हॅण्डलवरुन भारत आणि पाकिस्तान सामन्यातील 2 फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हर्ष पुरोहित नावाच्या भारतीय व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांचा हातात हात धरलेला फोटोचं पोस्टर दाखवत आहे. या पोस्टरवर, "भारत दहशतवादाविरुद्धच्या लढाईमध्ये इस्रायलबरोबर आहे," अशी ओळ लिहिलेली आहे.
भारतीय चाहत्याचा नरेंद्र मोदी स्टेडियमवरील हा फोटो शेअर करत, "आम्हाला आनंद आहे की वर्ल्ड कप 2023 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये भारत विजयी ठरला. भारताच्या या विजयामुळे पाकिस्तानला आपला विजय हमासच्या दहशतवाद्यांना समर्पित करता आला नाही," असा टोला नाओर गिलॉन यांनी लगावला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यामध्ये शतक झळकावल्यानंतर पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवानने आपलं शतक गाझामधील लोकांसाठी समर्पित करत असल्याचं सोशल मीडियावरुन पोस्ट केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर इस्रायलच्या भारतीय राजदूतांनी हा टोला लगावला आहे.
नक्की वाचा >> 2 भारतीय तरुणी करणार हमासच्या दहशतवाद्यांचा खात्मा! इस्रायली लष्कराकडून लढणार
"आम्ही आणच्या भारतीय मित्रांनी या सामन्यादरम्यान पोस्टर दाखवून आपण इस्रायलच्या बाजूने असल्याचं सांगत दर्शवलेली एकता पाहून भारावून गेलो आहोत," असंही राजदूत नाओर गिलॉन यांनी म्हटलं आहे.
4 हजार लोकांचा मृत्यू
7 ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायच्या सीमेजवळच्या गावांमध्ये घुसून नरसंहार केल्यापासून म्हणजेच मागील 2 आठवड्यांपासून इस्रायल आणि पॅलेस्टाइनदरम्यान युद्ध सुरु आहे. या युद्धात गाझामधील 2670 जणांचा मृत्यू झाला आहे. तर इस्रायलमधील 1400 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.