India vs New Zealand : मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवले गेलेल्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात (World Cup 2023 Semifinal) टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव केला आहे. किवींनी दिलेल्या चिवट झुंजीमुळे सामना अधिक रोमांचक झाला होता. मात्र, आता न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करून टीम इंडियाने फायनलमध्ये (India into the Final) दणक्यात एन्ट्री केली आहे. डॅरिल मिशेल याच्या वादळी शतकामुळे टीम इंडिया अडचणीत आली होती. मात्र, मोहम्मद शमीने (Mohammed Shami) सात विकेट घेत न्यूझीलंडला वर्ल्ड कपमधील प्रवास थांबवला आहे. कॅप्टन कुल केन विलियम्सनने मिशेलला मोलाची साथ दिली होती. मात्र, शमीच्या घातक माऱ्यासमोर न्यूझीलंडचे फलंदाज ढेपळले अन् टीम इंडियाने सेमीफायनलमधील पराभवाचा बदला घेतला आहे. त्यामुळे आता भारतीय संघाने फायनलमध्ये थाटात एन्ट्री मारली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर सेमी फायनलमध्ये विजयासाठी 398 धावांचं आव्हान ठेवलं होतं. टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 397 धावा केल्या. टीम इंडियाकडून विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या दोघांनी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. विराटने 117 आणि श्रेयसने 105 धावांची खेळी केली. आपल्या वैयक्तिक 50 व्या शतकाला गवसणी घालत विराट कोहली इतिहास रचला. तर श्रेयस अय्यर याने देखील शतक ठोकत टीम इंडियाला 400 च्या जवळ पोहोचवलं. त्याचबरोबर शुभमन गिल याने 80 धावांची महत्त्वाची खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाला 397 धावा उभ्या करता आल्या होत्या.



टीम इंडियाने दिलेल्या 398 धावांचं आव्हान पूर्ण करताना न्यूझीलंडची सुरूवात खराब झाली. डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र या दोन्ही सलामीवीरांना शमीने तंबूत पाठवलं. त्यानंतर मात्र, पारडं पलटलं... कॅप्टन केन आणि डॅरिल मिशेल यांनी संयमी आणि चिवट खेळी केली. 39 वर 2 वरून 220 वर 2 गडी बाद, अशी परिस्थिती न्यूझीलंडची होती. त्यामुळे रोहित शर्मा टेन्शनमध्ये आला होता. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून रोहितने पुन्हा आपल्या स्टार बॉलरच्या हातात बॉल सोपवला अन् शमीने देखील कॅप्टनला निराश केलं नाही. शमीने 33 व्या ओव्हरमध्ये केन विलियम्सन आणि टॉम लेथम यांना माघारी पाठवलं. त्यानंतर भारतीयांनी सुटकेचा श्वास घेतला. ग्लेन फिलिप्स भारी पडत असताना बुमराहने त्याचा पत्ता कट केला. तर शमीने पुन्हा एकदा सर्वांचं मन जिंकत शतक ठोकून मैदानात झुंजत असलेल्या डॅरिल मिशेल याला बाद केलं. त्यानंतर भारताने आरामात सामना खिशात घातलाय.


फायनलमध्ये भारताविरुद्ध कोण?


वर्ल्ड कपचा दुसरा सेमीफायनल सामना उद्या म्हणजेच 16 नोव्हेंबरला कोलकाताच्या ईडन गार्डनवर खेळवला जाणार आहे. साऊथ अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हा सामना खेळवला जाईल. या दोन्ही संघातील विजयी टीम 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानात फायनलमध्ये टीम इंडियाशी दोन हात करणार आहे.


भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (w), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.


न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (C), डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (डब्ल्यू), मिचेल सँटनर, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.