Pakistani Team: टीम इंडियाला 6 विकेट्सने पराभूत करत ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप 2023 वर आपले नाव कोरले आहे. यानंतर लाखो भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या पदरी निराशा आली आहे. हा पराभव भारतीय खेळाडुंच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या पराभवानंतर कॅप्टन रोहित शर्मासह अनेक खेळाडूंच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. असे असताना दुसरीकडे टीम इंडियाचे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानी टीम आनंदात आहे. त्यांच्या आनंदाचे नेमके काय कारण आहे? जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंतिम सामन्यामध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानी कॅप्टन बाबर आझमने ऑस्ट्रेलियन संघाचं अभिनंदन केलं. बाबर आझमने ऑस्ट्रेलियन संघाची कामगिरी ही कौतुकास्पद असल्याचं आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये म्हटलं. दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेटर्ससाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने राष्ट्रीय संघातील खेळाडूंची थकबाकी भरण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून नवीन केंद्रीय कराराशी संबंधित समस्येमुळे थकबाकी अडकली होती. नवीन करार सादर केल्यानंतर बहुतेक खेळाडूंनी त्यावर सही केली आहे. जूनपासून प्रलंबित असलेली त्यांची थकबाकी भरण्यात आली आहे. पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 


प्रत्यक्षात ज्यांनी अद्याप करारावर स्वाक्षरी केलेली नाही ते येत्या दोन दिवसांत करतील आणि त्यांची थकबाकीही दिली जाईल, असे सांगण्यात आले आहे. पाकिस्तानी खेळाडूंचे जुने करार जूनमध्ये संपले होते. दरम्यान पाकिस्तानी खेळाडू आणि पीसीबी यांच्यातील मतभेद वारंवार समोर येत असतात. याच कारणामुळे सप्टेंबर अखेरपर्यंत नवीन करारांची यादी जाहीर झाली नाही. यानंतर पाकिस्तानी टीम विश्वचषक खेळण्यासाठी भारतात आली होती. 


मासिक रिटेनरशिपमध्ये वाढ 


पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने खेळाडूंच्या मासिक रिटेनरशिपमध्ये लक्षणीय वाढ जाहीर केली होती आणि ICC (इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिल) कडून बोर्डाला मिळणाऱ्या वार्षिक कमाईच्या 3 टक्के वाटा देण्याला दुजोरा दिला होता. दुसरीकडे वर्ल्ड कप 2023 मधून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये सध्या खळबळ उडाली आहे. विश्वचषकात पाकिस्तानच्या खराब कामगिरीनंतर बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. आता पीसीबीने शाहीन शाह आफ्रिदीला टी-20 आणि शान मसूदला कसोटीचा कर्णधार बनवले आहे. मात्र, वनडे फॉरमॅटसाठी अद्याप कर्णधाराची नियुक्ती करण्यात आलेली नाही.


कर्णधारपदावर प्रश्न


2023 च्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट संघाने अत्यंत खराब कामगिरी केली. पाकिस्तान टीमने वर्ल्ड कप 2023 चे सुरुवातीचे 2 सामने जिंकले आणि आपण प्रबळ दावेदार असल्याचे दाखवून दिले. पण त्यानंतर टीमला विजयात सातत्य दाखवता आले नाही. पुढच्या सलग 4 सामन्यांमध्ये पाकिस्तानला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. पाकिस्तानी संघाच्या खराब कामगिरीनंतर बाबरच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित झाले होते. भारतातून परतल्यानंतर प्रथम बॉलर्स कोचला हटवण्यात आले. त्यानंतर संपूर्ण निवड समिती बरखास्त करण्यात आली आणि त्यानंतर बाबरनेही कर्णधारपदाचा राजीनामा दिला.