Rohit Sharma Worried : भारतीय संघ वर्ल्ड कप 2023 मध्ये भन्नाट कामगिरी करत आहे. भारताने आपले पहिले पाचही सामने जिंकले असून सहावा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे. विद्यमान विजेता असलेला इंग्लंडचा संघ यंदाच्या स्पर्धेत फारच सुमार कामगिरी करत आहे. इंग्लंडने आतापर्यंत खेळवलेल्या 4 सामन्यांपैकी केवळ एकच सामना जिंकला आहे. मात्र इंग्लंडचा संघ दमदार पुनरागमन करु शकतो. रविवारी भारत आणि इंग्लंडदरम्यान लखनऊच्या मैदानात सामना रंगणार आहे. धर्मशाला येथील सामन्यामध्ये भारताने न्यूझीलंडला धूळ चारत या स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या विजयाचा 20 वर्षांचा दुष्काळ संपवला.


बदली गोलंदाजाने 5 विकेट्स घेतल्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यामध्ये जायबंदी झालेला हार्दिक पंड्या खेळला नाही. त्यामुळे संघात 2 बदल करण्यात आले शार्दुल ठाकूरला संघात स्थान देण्यात आलं नाही. त्याऐवजी मोहम्मद शामीला संघात संधी देण्यात आली आणि सूर्यकुमारलाही अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळालं. मोहम्मद शामीने वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या बॉलवर विकेट काढण्याबरोबरच सामन्यात एकूण 5 विकेट्स घेतल्या. 


...म्हणून शामीऐवजी शार्दुलला संधी


शामीच्या या दमदार कामगिरीमुळे रोहित शर्मासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रोहित आणि संघ व्यवस्थापनाने मोहम्मद शामीला गोलंदाजीमधील पहिला पर्याय म्हणून गृहित धरलं नव्हतं. पहिल्या 4 सामन्यांमध्ये सातत्याने शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली. रोहित शर्माला आठव्या क्रमांकावर एक अष्टपैलू खेळाडू हवा असल्याने शामीऐवजी शार्दुलला संधी देण्यात आली. शार्दुलला या स्पर्धेत फलंदाजीची संधीच मिळाली नाही. मात्र त्याला गोलंदाजीतही चमक दाखवला आली नाही.


शार्दुलची सुमार कामगिरी


शार्दुल ठाकूरला मॅन विथ गोल्डन आर्म नावाने ओळखतात. म्हणजेच संघाला गरज असेल तेव्हा तो विकेट मिळवतो. खास करुन मधल्या ओव्हरमध्ये ब्रेक थ्रू मिळवून देण्यात शार्दुल पटाईत आहे. मात्र वर्ल्ड कप 2023 मध्ये त्याला हे जमलेलं नाही. 3 सामन्यांमध्ये शार्दुलने 17 ओव्हर टाकल्या आणि त्याला केवळ 2 विकेट घेता आल्या. त्याचा इकनॉमी रेट 5.16 वरुन 6.50 पर्यंत पोहोचला आहे.


कोणाला मिळणार संधी?


भारताचा पुढील सामना इंग्लंडविरुद्द असून इंग्लंडचा संघ फलंदाजीमध्ये दमदार आहे. हार्दिक पंड्या इंग्लडविरुद्ध खेळणार की नाही हे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे प्लेइंग इलेव्हन कशी असेल हे सांगता येत नाही. पंड्याच्या अनुपस्थितीमध्ये संघ शार्दुल ठाकूरच्या रुपात असलेल्या एकमेव मध्यमगती गोलंदाजाला संधी देणार की शामीला पुन्हा संधी देणार हे पहावं लागेल.


शामीने न्यूझीलंडविरुद्धच्या कामगिरीमधून आपला संघातील दावा शार्दुलपेक्षा नक्कीच मजबूत केला आहे. आता रोहित शर्मा शामीला संधी देतो की मित्र शार्दुलसाठी शमीला बाहेर बसवतो हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध शामीला चेंज बॉलर म्हणून संधी देण्यात आली होती. बुमराह, शामी आणि सिराजच्या तिहेरी माऱ्यापुढे न्यूझीलंडला केवळ 34 धावा करता आल्या. पहिल्या 10 ओव्हरमध्ये भारतीय गोलंदाजांनी 6 ते 9 मीटरचे गुड लेंथ गोलंदाजी केली. शामीने आपल्या पहिल्या 24 पैकी 17 बॉल याच टप्प्यात मारा करत टाकले आणि त्याचा संघाला फायदा झाला. शामी शेवटच्या ओव्हरमध्येही चांगली गोलंदाजी करतो.