IND vs NZ : भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी वर्ल्डकपच्या (World Cup) उपांत्य फेरीत धडक मारली आहे. दुसरीकडे ईडन्स गार्डनवर सुरु असेलेला इंग्लडविरुद्धचा सामना पाकिस्तानने जिंकले तरी ते पॉईंट टेबलमध्ये पाचव्या स्थानी राहणार आहेत. नेट रनरेट जास्त असल्याने न्यूझीलंडचे सेमीफायनलमध्ये स्थान पक्क झालं आहे. त्यामुळे आता सेमी फायनलमध्ये भारताचा सामना न्यूझीलंडशी तर ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर वर्ल्डकप 2023 च्या पहिल्या उपांत्य फेरीत (semi-finals) भारताचा न्यूझीलंडशी सामना होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या उपांत्य फेरीत भारताचा सामना किवी संघाशी 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दुपारी 2 वाजल्यापासून होणार आहे. दरम्यान,एकदिवसीय वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत भारत आणि न्यूझीलंड सलग दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. याआधी 2019 मध्येही दोन्ही संघांमध्ये स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना झाला होता. तेव्हाही भारत गुणतालिकेत अव्वल होता आणि न्यूझीलंड चौथ्या क्रमांकावर होता, यावेळीही परिस्थिती तशीच आहे. मात्र 2019 मध्ये मँचेस्टरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात न्यूझीलंडने 18 धावांनी विजय मिळवला होता.


आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीत भारत आणि न्यूझीलंड चौथ्यांदा आमनेसामने येणार आहेत. याआधी दोन्ही संघ वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तीनदा आमनेसामने आले होते. मात्र प्रत्येक वेळी न्यूझीलंडने विजय मिळवला. 2019 वर्ल्डकप व्यतिरिक्त, 2000 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये देखील दोघेही आमनेसामने आले होते.


भारताविरुद्ध न्यूझीलंड सरस


वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध न्यूझीलंडने प्रत्येक सामन्यात दमदार कामगिरी केली आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील 10 सामन्यांपैकी भारताने चार सामने जिंकले आहेत तर न्यूझीलंडने पाच वेळा विजय मिळवला आहे. एक सामना निकालाविना राहिला. त्यामुळे हा रेकॉर्ड तोडण्यासाठी भारताला न्यूझीलंडविरुद्ध ताकदीने खेळावं लागणार आहे.


न्यूझीलंड पुन्हा फॉर्मात


न्यूझीलंड हा असा संघ आहे जो मोठ्या टप्प्यांवर दमदार खेळी खेळतो आणि महत्त्वाच्या क्षणी सामन्यावर आपलं नियंत्रण मिळवतो. या स्पर्धेतही अनेकदा या संघाने हे सिद्ध करुन दाखवलं आहे. सलग तीन पराभव झाल्यानंतरही त्यांनी पाकिस्तानविरुद्ध 400 धावांची मजल मारली होती. लॉकी फर्ग्युसनच्या परत येण्यामुळे संघाची ताकद वाढली आहे. न्यूझीलंडचा स्टार वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टही फॉर्ममध्ये आला आहे. त्यामुळे भारतासमोर या दोघांकडून कडवे आव्हान असणार आहे.


घरच्या मैदानावर भारताकडून अपेक्षा


देशातच एवढी मोठी स्पर्धा होत असल्याने क्रिकेट चाहत्यांना आता भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. चाहते आणि प्रेक्षकांकडून येणारा दबाव ही अनेकदा दुधारी तलवार असते. न्यूझीलंडविरुद्ध रंगतदार लढत व्हावी अशी चाहत्यांची मोठी अपेक्षा आहे. त्यामुळे घरचं मैदान आणि चाहत्यांची अपेक्षा या सगळ्या आव्हानांचा भारताला सामना करावा लागणार आहे.


सहाव्या गोलंदाजाचे आव्हान


भारताच्या मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि बुमराह या पाच गोलंदाजांनी आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये उत्तम गोलंगादी करण्याचे सातत्य राखलं आहे. पण या पाच गोलंदाजांवरच भारताला अवलंबून राहून चालणार नाही. मैदानावर काय होईल याची शाश्वती नाही. त्यामुळे भारताचं टेंशन वाढणार आहे. कारण भारताकडे सहावा किंवा सातवा असा तगडा गोलंदाज नाही. मात्र न्यूझीलंडने मागच्या काही सामन्यात  कुलदीप यादवच्या षटकांत तुफानी खेळी खेळून त्यांच्या रणनीतीची झलक आधीच दाखवली आहे. त्यामुळे सेमीफायनच्या सामन्यातही न्यूझीलंडचा संघ याच आक्रमक पद्धतीने खेळणार हे नक्की. त्यामुळे भारत सहावा गोलंदाज म्हणून कोणाला आजमवणार याकडे सगळ्यांचे लक्ष्य लागलं आहे. 


भारतासमोर आतापर्यंत केवळ सोपी आव्हाने


भारताने आतापर्यंतच्या सर्व प्रतिस्पर्धी संघाना नमवून या स्पर्धेत वर्चस्व राखले आहे. भारतीय संघाला आतापर्यंत फक्त ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडनेच कडवे आव्हान दिले होते. काही खडतर सामने आणि काही पराभवही कोणत्याही बलाढ्य संघाला त्यांच्या कमकुवतपणाबद्दल आणि सुधारणेला वाव देत असतात. त्यामुळे या न्यूझीलंडबाबतची कोणतीही गोष्ट भारतीय संघाने हलक्यात घेऊ नये. जर असं झाल्यास वर्ल्डकपच्या दिशेने पाऊल टाकताना न्यूझीलंडचा संघ भारतासाठी अडथळा ठरु शकतो.