India vs New Zealand : मुंबईच्या वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium, Mumbai) भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रोमांचक असा सेमीफायनल सामना खेळवला जात आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) खांद्यावर टीम इंडियाची जबाबदारी आहे. तर केन विलियम्सन (Kane Williamson) किंवीना लीड करतोय. त्यामुळे आता सामना (IND vs NZ) रोमांचक होण्याची शक्यता आहे. सामन्यात बाजी मारून फायनलमध्ये जागा निश्चित कोण करणार? यावर सर्वांच लक्ष आहे. अशातच आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (ICC) परवानगी न घेता वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी बदलल्याचा दावा करण्यात आल्याने क्रिडाविश्वात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रिटीश वेबसाइट डेली मेलने (Daily Mail) दिलेल्या एका वृत्तामुळे आता क्रिडाविश्वात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. वर्ल्ड कपचा पहिला सेमीफायनल सामना अशा खेळपट्टीवर होणार आहे, जी आधीच दोनदा वापरली गेली आहे, त्यामुळे फिरकीपटूंना मदत केली जाऊ शकते. वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या सेमीफायनलसाठी सात क्रमांकाची खेळपट्टी वापरली जाणार होती, ज्या खेळपट्टीवर आत्तापर्यंत एकही सामना खेळवला गेला नव्हता. मात्र, सामना 6 व्या क्रमांकाच्या खेळपट्टीवर खेळवण्यात येतोय, असा आरोप डेली मेलच्या दिलेल्या बातमीमध्ये करण्यात आला आहे. BCCI आणि ICC अधिकार्‍यांना पाठवलेल्या व्हॉट्सअँप मेसेजवर यावर चर्चा होती, असंही डेली मेलच्या वृत्तामध्ये म्हटलंय.


आयसीसीचे स्वतंत्र खेळपट्टी सल्लागार यजमान आणि ठिकाणांसोबत त्यांच्या प्रस्तावित खेळपट्टीवर काम करतात. ही संपूर्ण प्रक्रिया स्पर्धेच्या आयोजनादरम्यान सुरू असते, असं बीसीसीआयच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं आहे. आयसीसी इव्हेंट्समधील खेळपट्टीची तयारी सहसा आयसीसी सल्लागार अँडी ऍटकिन्सन यांच्या देखरेखीखाली केली जाते. त्यामुळे ऍटकिन्सन यांच्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतात. आजचा सामना ज्या पीचवर खेळवला जात आहे, त्या पीचवर इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका आणि भारत यांच्यात सामना खेळवला गेला होता. 


आयसीसीचा नियम काय आहे?


साखळी सामने ज्या पीचवर खेळवले जातील, त्या पीचवर सेमीफायनल किंवा कोणतेही नॉकआऊट सामने खेळवले जाऊ नये, असा कोणताही नियम नाही. ताज्या खेळपट्टीवर नॉकआऊट सामने खेळवला जाणं आवश्यक नाही. सामन्यासाठी सर्वोत्तम खेळपट्टी आणि आउटफिल्ड असावी, यासाठी आयसीसीचा प्रयत्न असतो.