World Cup 2023 Jay Shah Arjuna Ranatunga: श्रीलंकेला 1996 साली वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या संघाचं नेतृत्व करणारा माजी कर्णधार अर्जुना रणतुंगाने भारतीय क्रिकेट नियामक मंडाळाचे अध्यक्ष जय शाह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सध्या श्रीलंकन क्रिकेट बोर्डासमोर निर्माण झालेल्या समस्यांसाठी जय शाह कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. 


बीसीसीआयसमोर नमतं घेणं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका स्फोटक मुलाखतीमध्ये अर्जुना रणतुंगाने जय शाह आणि श्रीलंकन क्रिकेट बोर्डाचे जवळचे संबंध असल्याचा आरोप केला आहे. या कारणामुळेच श्रीलंकन क्रिकेट बोर्ड बीसीसीआयसमोर अनेकदा नमतं घेतो असा दावा अर्जुना रणतुंगाने केला आहे. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांबरोबर जय शाहांच्या दृढ संबंधांमुळे बीसीसीआयला आपण श्रीलंकन क्रिकेट बोर्डावर वर्चस्व गाजवू शकतो असं वाटत असल्याचंही अर्जुना रणतुंगा म्हणाला आहे. इतक्यावरच न थांबता अर्जुना रणतुंगाने जय शाहाच श्रीलंकन क्रिकेटचा कारभार पाहत आहे तसेच त्यांच्या दबावातच श्रीलंकन क्रिकेट बोर्ड काम करत असल्याचंही म्हटलं आहे. 


श्रीलंकन क्रिकेटवर शाहांचं नियंत्रण


अर्जुना रणतुंगाने केवळ जय शाहांचं नाव घेण्याबरोबरच त्यांचे वडील आणि भारताचे गृहमंत्री अमित शाह यांचंही नाव घेतलं आहे. जय शाह यांच्याकडे सध्या असलेली ताकद ही त्यांच्या वडिलांकडून आली आहे, जे भारताचे गृहमंत्री आहेत, असं अर्जुना रणतुंगा म्हणाला. "जय शाह आणि श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांमध्ये असलेल्या संबंधांमुळे त्यांना (बीसीसीआयला) असं वाटतंय की ते श्रीलंकन क्रिकेट बोर्ड उलथवून लावू शकतात आणि त्यावर नियंत्रण मिळवू शकतात," असं अर्जुना रणतुंगाने 'डेली मीरर'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. 


थेट अमित शाहांचा दिला संदर्भ


"जय शाहाच श्रीलंकेतील क्रिकेटचा कारभार चालवत आहेत. जय शाह यांनी निर्माण केलेल्या दबावामुळे श्रीलंकन क्रिकेट बोर्ड उद्धवस्त झाला आहे. भारतातील एक व्यक्ती श्रीलंकन क्रिकेट नियंत्रित करत आहे. केवळ त्यांच्या वडिलांमुळे ते इतके शक्तीशाली आहे. त्यांचे वडील हे भारताचे गृहमंत्री आहेत," असं अर्जुना रणतुंगाने म्हटलं आहे.


श्रीलंका 9 व्या स्थानी


श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या कारभारामध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा ठपका ठेवत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने श्रीलंकन क्रिकेट बोर्ड बरखास्त केला. सध्या सुरु असलेल्या वर्ल्ड कप 2023 मधील श्रीलंकन संघाची कामगिरी सुमार राहीली असून ते साखळी फेरीमध्ये 9 व्या स्थानी आहेत. त्यांना केवळ अफगाणिस्तान, नेदरलॅण्डविरुद्धच्या सामने जिंकता आले. नवव्या स्थानी असल्याने श्रीलंकेला 2025 साली पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा खेळता येणार नाही.