मोईन अलीचा पाकिस्तानकडून खेळण्याचा विचार? World Cup दरम्यान इंग्लंडला मोठा धक्का?
World Cup 2023 Moeen Ali On Pakistan: इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली हा पाकिस्तानी वंशाचा आहे. मोईन अलीचे आजोबा हे पाकव्याप्त काश्मीरमधून इंग्लंडला स्थायिक झाले होते.
World Cup 2023 Moeen Ali On Pakistan: इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने पाकिस्तानी संघासंदर्भात मोठं विधान केलं आहे. विशेष म्हणजे मोईन अलीचे वंशज हे मूळचे पाकिस्तानचे असल्याने त्याने केलेल्या विधानाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. एका मुलाखतीमध्ये इंग्लंडच्या या अष्टपैलू खेळूडाने लहानपणापासूनच आपल्याला इंग्लंडच्या क्रिकेट संघाकडून खेळण्याची इच्छा होती असं म्हटलं आहे. मात्र पाकिस्तानी पालक असलेल्या असलेल्या मोईन अलीने पाकिस्तानीसंदर्भात बोलताना आपल्याला पाकिस्तानी संघ आवडतो असं म्हटलं आहे. तसेच वर्ल्ड कप सुरु असतानाच मोईन अलीने पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघाकडून खेळण्यासंदर्भातील प्रश्नावरही त्याने भाष्य केलं आहे.
वर्ल्ड कप 2023 मध्ये इंग्लंडचा उपकर्णधार
मोईन अलीचा जन्म लंडनमधील बर्मिंगहॅम येथे झाला. मात्र त्याचे आजोबा हे पाकव्याप्त काश्मीरमधून इंग्लंडमध्ये स्थायिक झाल्याने मोईन अलीला जन्मापासूनच ब्रिटीश नागरिक आहे. 2005 साली मोईन अलीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सध्या मोईन अली हा इंग्लंडच्या संघाचा अविभाज्य भाग असून वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेमध्ये त्याच्या खांद्यावर उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 'स्काय स्पोर्ट्स'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये या 36 वर्षीय खेळाडूने तरुणपणापासूनच आपल्याला इंग्लंडचा संघ जिंकाव असेच वाटत आले आहे, असं म्हटलंय. मोईन अलीला कधी पाकिस्तानकडून खेळावसं किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानसाठी खेळावं असं वाटलं नाही का? असा प्रश्न विचारण्यात आला.
पाकिस्तानकडून खेळावसं वाटलं नाही का?
पाकिस्तानकडून खेळावसं वाटलं नाही का या प्रश्नाला उत्तर देताना मोईन अलीने सज्ञान झाल्यापासून आपला पाठिंबा इंग्लंडच्या संघालाच होता, असं म्हटलं. "मी तरुण होतो तेव्हा कधीच मी पाकिस्तानला समर्थन करतो असं म्हटलं नव्हतं. मात्र पाकिस्तानी संघाच्या कामगिरीवर माझं कायम लक्ष असायचं कारण माझे सर्व काका आणि कुटुंबीय पाकिस्तानी संघाच्या कामगिरीवर लक्ष ठेऊन असायचे. मात्र वैयक्तिक स्तरावर मी कायमच इंग्लंडच्या संघाच्या बाजूने होतो आणि त्यांनी चांगली कामं करावी असं वाटायचं. कदाचित हे मला इंग्लंडसाठी खेळायची इच्छा असल्याने वाटत असावं," असंही मोईन अली म्हणाला आहे.
मला कट्टरतावादी समजू नये असं वाटायचं
तसेच मोईन अलीने, "मला तरुण असताना कायमच असं वाटायचं की मी कट्टरतावादी आहे असं लोकांनी समजू नये. माझ्या कुटुंबालाही मी कट्टरतावादी आहे किंवा होतोय असं वाटू नये असं फार वाटायचं. कारण तो काळच असा होता जेव्हा सर्वजण मुस्लिमांना कट्टरतावादी समजायचे," असंही प्रांजळपणे सांगितलं.
रवी बोपाराने फार महत्त्वाचा सल्ला
9 वर्षांपूर्वी आपल्याला संघ सहकारी रवी बोपाराने एक मोलाचा सल्ला दिला होता असं मोईन अलीने सांगितलं. "9 वर्षांपूर्वी मला रवी बोपाराने मला एक मोलाचा सल्ला दिला होता. तो म्हणाला होता, तू आहेस तसा राहा उगाच त्यांच्यासारखा होण्यासाठी प्रयत्न करु नकोस. त्यांना जर तू आवडत असशील तर तू आवडतो इतकं साधं गणित आहे. त्यांना तू आवडत नसशील तर ती त्यांची समस्या आहे. मला वाटतं की मला कोणीही दिलेला तो सर्वोत्तम सल्ला होता," असं मोईन अलीने सांगितलं.