ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने जबरदस्त कामगिरी केली. मोहम्मद शमीने 51 धावांमध्ये 5 गडी बाद केले. मोहम्मद शमीच्या या कामगिरीमुळे वर्ल्डकपमधील त्याच्याकडून असणाऱ्या अपेक्षा उंचावल्या आहेत. दरम्यान सामन्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोहम्मद शमीने प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळण्यासंबंधी आणि डावललं जाण्यासंबंधी मोठं विधान केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"जेव्हा मी नियमितपणे क्रिकेट खेळत होतो तेव्हा कोणीतरी असेलच ज्यांना बाहेर बसावं लागत होतं. त्याबद्दल मला वाईटही वाटत नव्हतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही बाहेर बसलेला असता तेव्हा वाईट वाटण्याचं कारण नाही. कारण त्यावेळी संघ जिंकत असतो," असं मोहम्मद शमीने सांगितलं. 


"हा टीमचा प्लान आहे आणि त्याच्यावर कायम राहणं महत्त्वाचं आहे. तुम्ही नेहमीच प्लेईंग 11 मध्ये असू शकत नाही. अनेकदा गोष्टी या टीम कॉम्बिनेशनवर अवलंबून असतात," असं मोहम्मद शमीने म्हटलं आहे. "जर तुम्ही चांगले खेळत असाल आणि त्यानंतरही प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळत नसेल तर जे खेळत आहेत त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. मला वाटत नाही की यात वाईट वाटण्याचं काही कारण आहे. संघ मला जी काही जबाबदारी देईल ती पार पाडण्यास मी तयार आहे," असं मोहम्मद शमीने स्पष्ट केलं. 


वर्ल्डकपच्या आधी रोटेशनवर खेळणं चांगली बाब असल्याचं मोहम्मद शमी म्हणाला आहे. "आम्हाला रोटेशनमुळे चांगले परिणाम मिळाले आहेत आणि मला वाटतं वर्ल्डकपच्या आधी एकामागोमाग एक सामने खेळत जास्त भार टाकू नये. सध्या चांगली कामगिरी सुरु असून, आम्हाला चांगले परिणाम मिळत आहेत," असं मोहम्मद शमी म्हणाला. मोहम्मद शमीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर ब्रेक घेतला होता. तसंच दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांसाठी तो वेस्ट इंडिजला गेला नव्हता. ब्रेक घेणं महत्त्वाचं होतं, कारण मी सलग 7 ते 8 महिने खेळत होतो. मला कुठेतरी विश्रांतीची गरज भासत होती असं मोहम्मद शमीने म्हटलं.