भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या जखमी झाल्याने मोहम्मद शामीला संघात संधी देण्यात आली असून त्याने त्याचं सोनं केलं आहे. न्यूझीलंडविरोधातील सामन्यात मोहम्मद शामीने जबरदस्त गोलंदाजी करत 5 विकेट्स मिळवले. धरमशाला येथील एपीसीए मैदानात झालेल्या सामन्यात आपल्या गोलंदाजीने मोहम्मद शामी सर्वांचं लक्ष वेधलं असून, 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. मोहम्मद शामीच्या जबरदस्त गोलंदाजीमुळे भारताने वर्ल्डकपमधील सलग पाचव्या विजयाची नोंद केली आहे. सामन्यानंतर मोहम्मद शामीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी मोहम्मद शामीने एका वाक्यात उत्तर देत सर्वांचं मनोरंजन केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान धरमशाला येथील सामन्यात धुरक्यामुळे सामना थांबवण्यात आला होता. याचा भारतीय संघाला फायदा झाला का, असं विचारण्यात आलं असता मोहम्मद शामीने पत्रकाराची शाळा घेतली. हे बघा जिंकल्यावर लोक असंच बोलतात आणि हारलो असतो तर उलटं बोलले असतो असं उत्तर मोहम्मद शामीने यावेळी दिलं.


न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 273 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारतीय संघ लक्ष्याचा पाठलाग करत असताना भारतीय संघाने 15.4 ओव्हर्समध्ये 2 विकेट्स गमावत 100 धावा केल्या होत्या. याचवेळी मैदानात धुरकं आल्याने दृश्यमानता कमी झाली होती. यामुळे अम्पायर्सनी काही वेळासाठी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. जवळपास 10 मिनिटांसाठी सामना थांबवण्यात आला होता. ग्राऊंड स्टाफ परिस्थिती सुरळीत करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत होता असं मोहम्मद शामीने सांगितलं आहे. 



"माझी काही तक्रार नाही, कारण दोन्ही संघांसाठी ही परिस्थिती सारखीच होती," असं मोहम्मद शामीने सांगितलं. "ग्राऊंडमन असहाय्य असल्याने त्यांना आम्ही काही बोलू शकत नाही. हे त्यांचं काम असून, त्यांनी सर्व प्रयत्न केले," असंही तो म्हणाला. 



पुढे तो म्हणाला की "भारतात आणि विदेशात परिस्थिती वर आणि खाली असते. कधी ओल्या तर कधी सुकलेल्या मैदानावर आम्हाला खेळावं लागतं. आमची काही तक्रार नाही".