World Cup 2023: पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात दाखल, सात वर्षात पहिल्यांदा असं घडलं
Pakistan Team Arrived In India: बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान क्रिके संघ आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ आज भारतात दाखल झाला. पाकिस्तानचा पहिला सामना 6 ऑक्टोबरला हैदराबादमध्ये रंगणार आहे.
Pakistan Team Arrived In India: भारतात येत्या 5 ऑक्टोबरपासून आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होतेय. या स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट संघ (Pakistan Cricket Team) भारतात दाखल झाला आहे. तब्बल सात वर्षांनंतर पाकिस्तान खेळाडूंनी भारताच्या जमिनीवर पाऊल ठेवलं आहे. याआधी पाकिस्तान क्रिकेट संघ 2016 मध्ये टी20 विश्वचषक (T20 World Cup 2016) स्पर्धा खेळण्यासाठी भारतात आला हातो. आता 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळण्यासाठी बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ भारतात आलाय. पाकिस्तानचा पहिला सामना 6 ऑक्टोबरला नेदरलँडशी रंगणार आहे. तर 10 ऑक्टोबरला पाकिस्तान श्रीलंकेशी दोन हात करेल.
करोडो क्रिकेट प्रेमींना प्रतीक्षा असलेला भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामना 14 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना होईल. याआधी एशिया कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान संघ आमने सामने आले होते. श्रीलंकेतल्या कोलंबोत झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवला होता.
भारत-पाकिस्तान वर्ल्ड कप रेकॉर्ड
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. आतापर्यंत झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान तब्बल 7 वेळा भिडले आहेत, आणि या सातही सामन्यात भारताने पाकिस्तानला धुळ चारली आहे. 1992, 1996, 1999, 2003, 2011, 2015 आणि 2019 या सातही विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट संघाला एकदाही भारतीय संघावर विजय मिळवता आलेला नाही. शेवटच्या म्हणजे 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव केला होता. या सामन्यात भारताने पहिली फलंदाजी करताना 5 विकेटच्या मोबदल्यात तब्बल 336 धावा केल्या होत्या. सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्याने पाकिस्तानला विजयासाठी 40 षटकात 302 धावांचं आव्हान देण्यात आलं. पण पाकिस्तान संघाला 6 विकेट गमावत केवळ 212 धावा बनवत्या आल्या. हा सामना भारताने 89 धावांनी जिंकला.
शेवटच्या 10 एकदिवसीय सामन्यांतील कामगिरी
भारत आणि पाकिस्तान संघात आतापर्यंत 134 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळवण्यात आले. यात 56 एकदिवसीय सामन्यात भारताने विजय मिळवला. तर 73 एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने बाजी मारली आहे. पण शेवटच्या 10 एकदिवसीय सामन्यातील कामगिरी पाहिली तर भारताचं पारडं जड आहे. दहापैकी सात सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. तर केवळ दोन सामन्यात पाकिस्तानला विजय मिळवता आला आहे. एक सामना पावसामुळे अनिर्णित राहिला.
पाकिस्ताने भारताला एकदिवसीय सामन्यात शेवटचं 2017 मध्ये हरवलं होतं. आयसीसी चॅम्पियन ट्ऱॉफीतला फायनलचा हा सामना होता. पाकिस्तानने टीम इंडियाचा 180 धावांनी पराभव केला होता.