World Cup 2023 Semi Finals Team India : भारताने 2011 साली एकदिवसीय क्रिकेटमधील वर्ल्ड कप जिंकला होता. मागील 12 वर्षांपासून भारत वर्ल्ड कपच्या प्रतिक्षेत आहे. सध्या भारतीय संघ वर्ल्ड कप 2023 मध्ये ज्या पद्धतीने कामगिरी करत आहे ते पाहाता भारतीयांची ही प्रतिक्षा लवकरच संपेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने स्पर्धेतील आपले पहिले चारही सामने जिंकले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी भारतीय संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. भारतीय संघ आज म्हणजेच रविवार, 22 ऑक्टोबर 2023 रोजी न्यूझीलंडविरुद्ध महत्त्वाचा सामना खेळणार आहे. स्पर्धेतील या 21 व्या सामन्यात आतापर्यंत अपराजित राहिलेले संघ हिमाचलमधील धरमशालाच्या मैदानात आमने-सामने येणार आहेत. 


17 सामने गमावले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने आजचा न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकला तर पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल स्थान गाठता येईल. या स्पर्धेमध्ये 10 संघ खेळत असून अव्वल 4 संघांना उपांत्यफेरीचं तिकीट मिळणार आहे. सध्या पॉइण्ट्स टेबलमध्ये तळाशी असलेल्या 6 संघांनी आपले 17 सामने गमावले आहेत. त्यामुळे भारताचा उपांत्यफेरीतील प्रवेश अधिक सुखकर झाला आहे. नेमकं हे गणित कसं आहे पाहूयात...


पॉइण्ट्स टेबलमधील संघांची परिस्थिती कशी?


वर्ल्ड कप 2023 ची स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवली जात आहे. प्रत्येक संघ स्पर्धेत सहभागी असलेल्या प्रत्येक संघाविरोधात 1 सामना खेळणार आहे. म्हणजेच प्रत्येक संघ 9 सामने खेळणार आहे. त्यानंतर उपांत्यफेरीसाठी 4 संघ पात्र होतील. कोणत्याही संघाला उपांत्यफेरीमध्ये म्हणजेच सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी आपल्या 9 पैकी 7 सामने जिंकावे लागणार आहे. मात्र पहिल्या 20 सामन्यांनंतर इंग्लंड, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलॅण्ड्स आणि अफगाणिस्तान या 5 संघांनी आपले 3 सामने गमावले आहेत. या 5 ही संघांना 3 सामन्यांमध्ये पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे. म्हणजेच आता पुढील सर्व सामने जिंकले तरी त्यांच्या पॉइण्ट्सची संख्या 14 पर्यंत पोहचणार नाही. हे 5 संघ जास्तीत जास्त 12 पॉइण्ट्सपर्यंत मजल मारु शकतील. मात्र आता या 5 संघांच्या सामन्यांचा थेट परिणाम पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी असलेल्या संघांवरही होणार आहे. हे संघ एकमेकांविरोधात खेळताना पराभूत झाले तरी अव्वल संघांची उपांत्यफेरीत जाण्याची शक्यता वाढेल.


भारतासाठी नेमकं गणित कसं?


भारत आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 20 सामने खेळवण्यात आले आहेत. यापैकी विद्यमान विजेता संघ असलेल्या इंग्लंडची कामगिरी फारच सुमार आहे. इंग्लंडने आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यांपैकी केवळ 1 सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे. इंग्लंडचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना 229 धावांनी पराभूत झाल्यानंतर नवव्या स्थानी फेकला गेला आहे. दुसरीकडे भारताने आपल्या 4 पैकी 4 ही सामन्यांमध्ये विजय मिळवत 8 पॉइण्ट्स कमावले आहेत. आता भारतीय संघाला थेट उपांत्यफेरीसाठी पात्र होण्याच्या दृष्टीने उर्वरित 5 सामन्यांपैकी 3 सामने जिंकायचे आहेत. भारताचा एक सामना नेदरलॅण्डविरोधात आहे. त्यामुळे भारताचं पारडं अधिक जड आहे. मात्र नेदरलॅण्डने दक्षिण आफ्रिकेसारख्या दादा संघाला धूळ चारल्याने त्यांना हलक्यात घेता येणार नाही. श्रीलंकाची कामगिरीही आतापर्यंत सुमारच राहिली आहे. श्रीलंकेला या मालिकेमध्ये केवळ एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याचंही फारसं टेन्शन घेण्याची गरज नाही. त्यामुळे उरलेल्या 3 सामन्यांपैकी इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यांपैकी 1 सामना जिंकला तरी भारत उपांत्यफेरीमध्ये स्थान निश्चित करु शकतो. 


न्यूझीलंडचाही मार्ग सुखकर


वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्या 20 सामन्यांनंतर केवल न्यूझीलंड आणि भारतीय संघ अपराजित आहे. हे 2 संघ वगळता उरलेल्या 8 संघांपैकी प्रत्येक संघांला एखाद्या तरी पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे. आतापर्यंत 4 सामने जिंकणारा न्यूझीलंडही भारताप्रमाणे आपल्या उरलेल्या 5 पैकी 3 सामने जिंकून उपांत्यफेरीत धडक मारु शकतो. म्हणजेच भारत आणि न्यूझीलंडचं उपांत्यफेरी गाठणं अगदी पक्कं आहे. दक्षिण आफ्रिकेने 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्यांचीही उपांत्यफेरीतील दावेदारी मजबूत मानली जात आहे. दुसरीकेड पाकिस्तानी आणि ऑस्ट्रेलियाने आपल्या 4 सामन्यांपैकी प्रत्येकी 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे या दोन्ही संघांना आपले उर्वरित 5 ही सामने जिंकावे लागणार आहे. एखाद्या सामन्यात पराभव झाला तरी या संघांचं उपांत्यफेरी गाठणं कठीण जाऊ शकतं.



पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया पुढे मोठं आव्हान 


पाकिस्तानीची या स्पर्धेतील कामगिरी तशी सुमारच राहिली आहे. आपले पहिले 2 सामने जिंकल्यानंतर पाकिस्तानला आधी भारताने आणि नंतर ऑस्ट्रेलियाने मोठ्या फरकाने पराभूत केलं. पाकिस्तानचा पुढील सामना 23 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. अफगाणिस्तानही पाकिस्तानचं टेन्शन वाढवू शकतो. अफगाणिस्तानने इंग्लंडला पराभूत करुन आधीच या स्पर्धेत एक मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे ते पाकिस्तानलाही पराभूत करु शकतात असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. चेन्नईच्या फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर राशिद खान आणि मुजीब उर रहमानच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानी फलंदाजांची कसरत होणार हे निश्चित आहे. त्यामुळे पाकिस्तानचं भवितव्य अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यावर अवलंबून आहे हे निश्चित.