World Cup 2023 : अफगाणिस्तानचा (afghanistan) क्रिकेटपटू राशिद खान (Rashid Khan) आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्याबाबत सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. व्हायरल मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, ज्येष्ठ भारतीय उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी अफगाणिस्तानचा क्रिकेटर राशिद खानला 10 कोटी रुपयांची मोठी रक्कम दिली आहे. मात्र उद्योगपती रतन टाटा यांनी सोमवारी त्यांच्या नावावर करण्यात आलेले दावे फेटाळले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करत रतन टाटा यांनी याबाबत खुलासा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर एक फेक न्यूज व्हायरल होत होती. रतन टाटांनी यामध्ये क्रिकेटर राशिद खानला 10 कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले. जेव्हा ही गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली तेव्हा रतन टाटा यांनी स्वतः पोस्ट लिहून त्याचे खंडन केले. अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू राशिद खान आणि रतन टाटा यांच्याबाबत हा मेसेज वेगाने व्हायरल होत आहे. अफगाणिस्तानचा क्रिकेटर राशिद खान याने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारताचा तिरंगा फडकावला होता, त्यासाठी आयसीसीने 55 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. अशातच टाटा राशिद खानला 10 कोटी रुपये देणार अशी अफवा पसरवण्यात आली आहे.


रतन टाटांचे स्पष्टीकरण


"कोणत्याही खेळाडूवर दंड किंवा बक्षीस देण्याबाबत मी आयसीसी किंवा कोणत्याही क्रिकेट फॅकल्टीला कोणतीही सूचना दिलेली नाही. माझा क्रिकेटशी लांब लांब पर्यंत काहीही संबंध नाही. कृपा करुन अशा व्हॉट्सअॅप फॉरवर्ड मेसेज आणि व्हिडिओवर विश्वास ठेवू नका. माझ्या अधिकृत प्लॅटफॉर्मवरून कोणतीही माहिती आल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका," असे रतन टाटा म्हणाले.



सोशल मीडियावर रतन टाटा अफगाणिस्तानच्या खेळाडूला मदत करत असल्याचा दावा यापूर्वी अनेक यूजर्सनी केला होता. एका यूजरने 27 ऑक्टोबर रोजी, "पाकिस्तानवरील विजयाचा आनंद साजरा करताना छातीवर भारताचा ध्वज लावल्याबद्दल आयसीसीने 55 लाख रुपयांचा दंड ठोठावलेल्या क्रिकेटर राशिद खानला आर्थिक मदत केल्याबद्दल मी रतन टाटा यांचे अभिनंदन करतो," असे म्हटलं होतं.