‘विराट असाच खेळत राहिला तर वर्ल्ड कप संपेपर्यंत तो...’; रिकी पाँटिंगचं भाकित
Ricky Ponting Prediction About Virat Kohli: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि सातत्याने भारताबद्दल खोचक विधानं केल्याने अनेकदा चर्चेत आलेल्या रिकी पाँटिंगने विराट कोहलीबद्दल एक मोठं भाकित व्यक्त केलं असून त्याने वर्ल्ड कपच्या संदर्भातून हे विधान केलं आहे.
Ricky Ponting Prediction About Virat Kohli: सध्या सुरु असलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भारताचा मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज विराट कोहली चमकदार कामगिरी करतोय. पाकिस्तानविरुद्धचा सामना वगळता विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात के. एल. राहुलच्या सोबतीने संयमी खेळी करत आपण शांतपणे खेळूनही सामना जिंकून देऊ शकतो हे दाखवलं. तर अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातही विराटने अर्धशतकं झळकावलं. विराट कोहलीची सातत्यपूर्ण कामगिरी ही भारतासाठी शुभ संकेत असल्याचं मानलं जात आहे. अशातच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने विराट कोहलीसंदर्भात एक भाकित व्यक्त केलं आहे.
2 धावांवर 3 गडी बाद अशी स्थिती असताना...
चेपॉकच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध यंदाच्या पर्वातील भारताच्या पहिल्याच वर्ल्ड सामन्यामध्ये विराटने उत्तम फलंदाजी केली. 2 धावांवर 3 गडी बाद अशी भारताची स्थिती असतानाही विराटने के. एल. राहुलच्या सोबतीनं विजयश्री खेचून आणली. अवघ्या 14 धावांनी विराटचं शतक हुकलं. विराटने पॅट कमिन्स आणि ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांसमोर संयमी खेळी करत डावाला आकार दिला आणि भारत जिंकेल हे सुनिश्चित केलं. विराटची ही खेळी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. सामान्यपणे मैदानात आरडाओरड करणारा आणि बेभान होणारा विराट या खेळीदरम्यान फारच संयमी भूमिकेत दिसला.
पहिल्याच सामन्यात विराटचं शतक हुकलं
विराटला चालून आलेली एकदिवसीय क्रिकेटमधील 48 वं शतक करण्याची संधी अवघ्या 14 धावांनी हुकली. मात्र विराट सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या 49 शतकांच्या विक्रमापासून केवळ 2 शतकं दूर आहे. ही आकडेवारी पाहून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने विराट कोहलीबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे. विराट कोहली यंदाच्या वर्ल्ड कपमध्येच सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडेल असा विश्वास रिकी पाँटिंगने व्यक्त केला आहे.
कदाचित त्याचा शेवटचा वर्ल्ड कप असेल
“मला वाटतं तो हे करु शकतो. मला नक्की खात्री आहे की तो 2 शतकं झळकावले. अर्थात तो 3 शतकंही झळकावू शकतो हे नाकारता येणार नाही. मात्र भारतामधील मैदानं, खेळपट्ट्या आणि वेगवेगळी ठिकाणं पाहता धावा करणं आणि मोठी धावसंख्या उभारणं सहज शख्य आहे. हा कदाचित त्याचा शेवटचा वर्ल्ड कप असू शकतो. तो याच विचाराने खेळला तर 2 शतकं होतीलच. तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की त्याला धावांची किती भूक आहे. तो विजेता खेळाडू आहे. त्याला त्याच्यासाठी आणि त्याच्या संघासाठी यश मिळवण्यातच सार्थता वाटते,” असं रिकी पाँटिंगने म्हटलं आहे.
तो असाच खेळत राहिला तर
“तो असाच खेळत राहिला तर हा वर्ल्ड कप संपेपर्यंत तो सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी (एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झलकावण्याच्या विक्रमाशी) बरोबरी करु शकतो किंवा तो विक्रम मोडू ही शकतो. हे खरोखरच कौतुकास्पद ठरेल,” असंही रिकी पाँटिंगने विराटबद्दल प्रतिक्रिया नोंदवताना म्हटलं आहे.