SA vs AUS : पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या ऑस्ट्रेलियाला यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेत दोनदा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. सलग दोनदा पराभव झाल्यानं चाहतेही ऑस्ट्रेलियाच्या संघावर चांगलेच नाराज आहेत. गुरुवारी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 134 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून अशी अपेक्षा कोणीही केली नसेल. अशातच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान, ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) ड्रेसिंग रूममध्ये बसून ई-सिगारेट (e - cigarette) ओढताना दिसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. मॅक्सवेल मॅचदरम्यान सिगारेट ओढताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियन संघ एकना स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना खेळण्यासाठी आला होता. सामनादरम्यान ऑस्ट्रेलियाची अवस्था दयनीय झाली असताना मॅक्सवेल ड्रेसिंग रूमच्या पॅव्हेलियनमध्ये बसून वॅप (ई-सिगारेट) ओढताना दिसला. मॅक्सवेल हातात लपवून ई-सिगारेट ओढत असला तरी तोंडातून निघणाऱ्या धुरावरून तो सिगारेट ओढत असल्याचे स्पष्ट झाले.


या सामन्यात सुरुवातीच्या डावात गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मॅक्सवेलने 10 षटकांमध्ये 34 धावा देऊन दोन विकेट घेतल्या होत्या. मात्र त्याला फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने 17 चेंडूंमध्ये केवळ तीन धावा केल्या आणि केशव महाराजने त्याला बाद केले. मॅक्सवेल बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघात आणखी अडचणी वाढल्या. 20 षटकांवर ऑस्ट्रेलियाची अवस्था 80 धावांत 6 विकेट्स अशी होती. यावेळी पॅव्हेलियनमध्ये बसलेल्या मॅक्सवेलकडे कॅमेरा वळला तेव्हा तो सिगारेट ओढताना दिसला.



काही नेटकऱ्यांनी मॅक्सवेलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. सामान्यत: खेळाडू सामन्यादरम्यान धूम्रपान किंवा कोणत्याही प्रकारच्या मादक पदार्थांपासून दूर राहतात. भारतात ई-सिगारेटवर बंदी आहे. पण मॅक्सवेलला इथल्या कायद्याची माहिती नसावी. त्यामुळे त्याने सोबत एक ई-सिगारेट आणली होती आणि मॅचदरम्यान उघडपणे ती ओढली. 


दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा या सामन्यात 134 धावांनी पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर 312 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. मात्र संघाला केवळ 177 धावा करता आल्या. वर्ल्ड कप सामन्यात ऑस्ट्रेलियाचा हा सगळ्यात मोठा पराभव आहे. दोन्ही सामन्यात पराभव झाल्याने ऑस्ट्रेलियाला अद्याप एकही गुण मिळालेला नाहीये. त्यामुळ संघ पॉईन्ट टेबलमध्ये नवव्या स्थानावर आहे. आता सोमवारी ऑस्ट्रेलिया श्रीलंकेविरुद्ध तिसरा सामना खेळणार आहे.