World Cup 2023 Sourav Ganguly Bold Claim About Pakistan: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ वर्ल्ड कप 2023 स्पर्धेमध्ये सर्वात आधी सेमीफायलनमध्ये पात्र ठरणारा पहिला संघ ठरला आहे. मुंबईमध्ये श्रीलंकन संघाविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवत भारताने 2 सामने शिल्लक असतानाच सेमीफायलनमध्ये आपली जागा निश्चित केली. त्यानंतरच्या सामन्यात पॉइण्ट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिकेला भारताने पराभूत केलं. भारताने 8 पैकी 8 सामने जिंकले असून शेवटचा सामना नेदरलॅण्डविरुद्ध असल्याने भारत अपराजित राहूनच सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल असं म्हटलं जात आहे. मात्र भारत सेमीफायलनमध्ये कोणाचा सामना करणार याचं उत्तर अद्याप सापडलेलं नाही. भारताबरोबरच दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने सेमी फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. आता चौथ्या स्थानासाठी पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानमध्ये चूरस सुरु आहे. मात्र भारत सेमीफायलन कोणाविरुद्ध आणि कुठे खेळणार हे समोर कोणता संघ असेल यावर अवलंबून असणार आहे.


कोण खेळणार यावर ठरणार तारीख आणि ठिकाण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत सेमीफायलनचा सामना न्यूझीलंड किंवा अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार असेल तर तो सामना मुंबईमध्ये 15 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. जर सेमीफायलनचा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळवला जाणार असेल तर तो कोलकात्यामधील ईडन गार्डन्समध्ये 16 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. पाकिस्तानचा संघ मुंबईत खेळणार नाही हे स्पर्धा सुरु होण्याच्या आधीच ठरलं होतं. पाकिस्तानचे सेमी फायनलचा सामना कोलकात्यामध्ये होईल हे पूर्वीपासूनच ठरलं होतं.


गांगुलीचं म्हणणं काय?


याच कारणामुळे भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयच्या अध्यक्षपदी राहिलेल्या सौरव गांगुलीने पाकिस्तान सेमी-फायनलसाठी पात्र ठरावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. "मला वाटतं की पाकिस्तानची टीम सेमी-फायनलमध्ये पोहचावी. त्यांनी भारताविरुद्ध खेळावं. यापेक्षा मोठी सेमी-फायनल ठरु शकत नाही," असंही गांगुलीने 'स्पोर्ट्स तक'शी संवाद साधताना म्हटलं. सौरव गांगुलीचं होम ग्राऊण्ड असलेल्या ईडन गार्डन्समध्ये 2016 साली भारत विरुद्ध पाकिस्तानदरम्यान टी-20 वर्ल्ड कपचा सामना रंगला होता. 


कोण कोणत्या स्थानी?


न्यूझीलंडचा नेट रन रेट +0.398 इतका असून पाकिस्तानचा नेट रन रेट +0.036 वर तर अफगाणिस्तानचा नेट रन रेट -0.338 इतका आहे. न्यूझीलंडचा शेवटचा सामना आज श्रीलंकेविरुद्ध होत आहे. पाकिस्तानचा साखळी फेरीतील शेवटचा सामना शनिवारी कोलकात्यामध्ये इंग्लंडविरुद्ध होणार आहे. दर अफगाणिस्तानचा शेवटचा सामना शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. न्यूझीलंडला केवळ श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकायचा आहे. हा सामना जिंकला तरी न्यूझीलंड सेमीफायनलसाठी पात्र ठरणारी चौथी टीम ठरेल. नेट रन रेट पाहता न्यूझीलंड पात्र होण्याची शक्यता अधिक आहे.