World Cup 2023: विश्वचषक स्पर्धेआधी संघात मोठा बदल, 2 खेळाडू बाहेर, यांना मिळाली संधी
ODI World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला आता अवघ्या काही दिवसांचा अवधी राहिला आहे. त्याआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. संघात अचानक मोठा बदल करण्यात आला आहे. दोन महत्त्वाच्या खेळाडूंना बाहेर बसावलं लागलंय.
ICC ODI World Cup 2023: क्रिकेटचा महाकुंभमेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला आता अवघ्या काही दिवसांचा अवधी राहिला आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या जवळपास सर्व दहा संघांनी आपल्या खेळाडूंची घोषणा केली आहे. पण एका संघात अचानक बदल करण्यात आला आहे. संघातील दोन स्टार खेळाडूंना विश्वचषक स्पर्धेतून (ODI WC 2023) बाहेर बसावलं लागलं आहे. या खेळाडंच्या जागेवर युवा खेळाडूंना संघात संधी देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.
विश्वचषक स्पर्धेआधी संघात बदल
आयसीसी विश्वचषक स्पर्धा 2023 आधी दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील स्टार खेळाडू एनरिक नॉर्खिया (Anrich Nortje) आणि सिसांजा मगाला (Sisanda Magala) फिटनेस टेस्ट पास करण्यात असमर्थ ठरले आहेत. विश्वचषक स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या 15 खेळाडूंची घोषणा करण्यात आली होती. यात नॉर्खिया आणि मगाला यांना संधी देण्यात आली होती. पण नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दोघांना दुखापत झाली. एनरिक नॉर्खियाच्या कमरेला दुखापत झाली आहे, तर मगालाच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली.
या खेळाडूंना मिळाली संधी
नॉर्खिया आणि मगाला यांच्या जागी वेगवान गोलंदाज एंडिले फेहलुकवायो आणि लिजाद विलियम्स यांना संघात संधी देण्यात आली आहे. एंडिले फेहलुकवायोला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन एकदिवसीय सामन्यात खेळला होता. मालिकेच्या शेवटच्या सामन्यात त्याने फेहलुकायोने अवघ्या 19 चेंडूत दोन चौकर आणि तब्बल चार षटकार मारत नाबाद 38 धावांची जबरदस्त खेळी केली होती.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाची गोलंदाजी मजबूत आहे. कागिसो रबाडा, मार्को जानसेन, लुंगी एनगिडी आणि गेराल्ड कोएट्जी या वेगवान गोलंदाजांचा दक्षिण आफ्रिका संघात समावेश आहे.
विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ
टेम्बा बवूमा (कर्णधार), रासी वान डर डुसेन, गेराल्ड कोएट्जी, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीजा हेंड्रिक्स, मार्को जानसेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्करम, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, एंडिले फेहलुकवायो, लिजाद विलियम्स.
विश्वचषक स्पर्धेचे सामने कोणत्या स्टेडिअमवर?
एकदिवसीय विश्व चषक स्पर्धा देशातल्या दहा स्टेडिअमवर खेळवली जाणार आहे. यात हैदराबाद, अहमदाबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरु, मुंबई आणि कोलकाता या शहरांचा समावेश आहे. याशिवाय गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरुममध्ये 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरदरम्यान सराव सामने खेळवले जातील.