भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली पुढील शतक कधी ठोकणार याकडे चाहत्याचं लक्ष आहे. याचं कारण विराट कोहलीने 48 शतकं ठोकली असून, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डची बरोबरी करण्यापासून फक्त एक शतक दूर आहे. सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. दरम्यान विराट कोहली एका मोठ्या रेकॉर्डला गवसणी घालणार असताना त्याने मात्र आपण कधीच रेकॉर्डसाठी खेळलो नसल्याचं सांगितलं आहे. विराट कोहलीने आपण करिअरमधील इतकी वर्षं खेळत असल्याबद्दल आभार व्यक्त करताना 78 आंतरराष्ट्रीय शतकं आणि 26 हजार धावा करणं हा आपल्या सुरुवातीच्या आकांक्षाचा भाग नव्हते असं सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"जर आपण क्रिकेटबद्दल बोलत असू, तर मी माझ्या करिअरमध्ये कुठे असेन किंवा इतकं काही मिळवायचं असा विचार केला नव्हता. देवाने मला इतकी वर्षं खेळण्याची संधी दिली आहे. मी हे करण्याचं स्वप्न नक्की पाहिलं होतं, पण त्या कशा मिळवायच्या याचा मी विचार केला नव्हता. कोणीही यासंबंधी योजना आखू शकत नाही, गोष्टी कशाप्रकारे तुमच्या उलगडल्या जातील हे तुम्हाला माहिती नसतं. मी 12 वर्षात इतकी शतकं ठोकेन किंवा धावा करेन असा विचार कधीच केला नव्हता," असं विराट कोहीने स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.


तीन वर्षं एकही शतक न करु शकलेल्या विराटने सप्टेंबर महिन्यापासून 8 शतकं ठोकली आहेत. यामध्ये एकदिवसीयमध्ये 5, टी-20मध्ये 1 आणि कसोटीत 2 शतकांचा समावेश आहे. वर्ल्डकपमधील 6 सामन्यांमध्ये विराट कोहलीने 354 धावा केल्या असून रोहित शर्मानंतर सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. इंग्लंडविरोधातील सामन्यात विराट शून्यावर बाद झाला. तर त्याआधी न्यूझीलंडविरोधात 95 धावांवर बाद झाल्याने त्याचं शतक थोडक्यात हुकलं. 


विराटने 2012 मध्ये स्वत:मध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून तो शिस्तीने सर्व गोष्टींचं पालन करत आहे. "मी संघासाठी चांगली कामगिरी करावी आणि कठीण परिस्थितीत संघासाठी सामने जिंकावेत हे माझं मुख्य लक्ष्य होतं. यामुळे मी माझी शिस्त आणि जीवनशैलीत महत्त्वाचे बदल केले. माझ्यात कौशल्य होतं, पण प्रोफेशनलिझमची कमतरता होती. पण आता मला कसं खेळायचं आहे याची मला जाणीव असून त्यावर लक्ष्य केंद्रीत आहे. यामुळे मला त्याचे निकालही दिसत आहेत," असं विराटने सांगितलं आहे.


"या खेळात मेहनतीची गरज आहे. मी माझ्या करिअरमध्ये हीच गोष्ट शिकलो आहे. मी मैदानात माझे 100 टक्के देत क्रिकेट खेळत आहे आणि त्यामुळे देवानेही मला आशीर्वाद दिला आहे. माझ्यासह गोष्टी अशाप्रकारे घडतील याचा मी कधी विचारही केला नव्हता," असं विराट म्हणाला आहे.