`...तर विराट कोहली लगेच निवृत्तीची घोषणा करेल`; World Cup आधीच मोठी भविष्यवाणी
World Cup 2023 Virat Kohli Retirement: 5 ऑक्टोबरपासून भारतामध्ये एकदिवसीय क्रिकेटची वर्ल्डकप स्पर्धा खेळवली जात असून या स्पर्धेमध्ये सर्वाचं लक्ष विराट कोलहीवर असतानाच ए. बी. डिव्हिलिअर्सने एक धक्कादायक विधान केलं आहे.
World Cup 2023 Virat Kohli Retirement: दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ए. बी. डिव्हिलिअर्सने विराट कोहलीच्या निवृत्तीबद्दल मोठं विधान केलं आहे. मागील अनेक वर्षांपासून इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलमधील रॉयल चँलेंजर्स बंगळुरुच्या संघामधून ए. बी. डिव्हिलिअर्स आणि विराट कोहली एकत्र खेळत होते. हे दोघेही एकमेकांचा चांगले मित्र आहेत. त्यामुळेच ए. बी. डिव्हिलिअर्सने मांडलेल्या मताला महत्त्व असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु असून ए.बी. डिव्हिलिअर्सने दिलेल्या संकेतांनुसार विराट लवकरच निवृत्त होईल असं समजतं.
काय म्हणाला विराटचा बेस्ट फ्रेण्ड?
भारताने 2023 चा वर्ल्डकप जिंकला तर विराट कोहली लगेच निवृत्ती जाहीर करु शकतो असं डिव्हिलिअर्स म्हणाला आहे. भारताने तिसऱ्यांदा एकदिवसीयव वर्ल्डकपवर नाव कोरलं तर विराट एकदिवसीय क्रिकेट आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्त होऊन कसोटी क्रिकेटवर अधिक लक्ष देऊ शकतो असं मत डिव्हिलिअर्सने व्यक्त केलं आहे. असं झालं तर विराटला पुढील अनेक वर्ष कसोटी क्रिकेट खेळता येईल असंही डिव्हिलिअर्स म्हणाला. मात्र एकीकडे विराटच्या निवृत्तीबद्दल बोलताना दुसरीकडे विराटची फिटनेस आणि सध्याची कामगिरी पाहता तो वर्ल्डकपच्या निकालावर अवलंबून न राहता नंतर खेळत राहिला तरी कोणाची काही हरकत नसेल असंही डिव्हिलिअर्सने म्हटलं.
क्रिकेटचा कायमचा निरोप
"माझ्या मते त्यांनी (भारताने) एकदिवसीय वर्ल्डकप जिंकला तर तो अगदीच चुकीचा वेळ नसेल जेव्हा तो क्रिकेटचा (कसोटी वगळता) निरोप घेऊ शकतो. 'धन्यवाद. मी आता पुढील काही वर्ष केवळ कसोटी क्रिकेट आणि काही प्रमाणात आयपीएल खेळेन. माझ्या करिअरमधील शेवटची काही वर्ष खेळाचा आनंद घेईन, कुटुंबाला वेळ देईन आणि क्रिकेटचा कायमचा निरोप घेईन,' असं तो म्हणून शकतो असं मला वाटतं," अशी प्रतिक्रिया डिव्हिलिअर्सने नोंदवली आहे.
मात्र डिव्हिलिअर्सने हे विधानही केलं
मात्र यानंतर पुढे बोलताना डिव्हिलिअर्सने, "पण त्याची प्रकृती, फिटनेस पाहता तो मानसिक दृष्ट्या पुढेही खेळू शकतो. त्याला वेळोवेळी आराम देण्यात आला असून हा उत्तम निर्णय असल्याचं मला वाटतं. त्यामुळेच त्याची धावांची भूक कायम असेल असं मला वाटतं," असंही म्हटलं आहे.
सचिनचा शतकांचा विक्रम विराट मोडेल का?
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडू शकेल का असा प्रश्न एका चाहत्याने डिव्हिलिअर्सला विचारला. त्यावर प्रतिक्रिया देताना डिव्हिलिअर्सने विक्रम मोडण्यासाठी विराट खेळत नसून संघाला विजय मिळवून देण्यासाठी खेळतो असं सांगितलं. "मला नाही वाटत त्याचं लक्ष्य हे असेल. तो या अशा विक्रमांची चिंता करत नाही. त्याला केवळ त्याच्या संघासाठी वर्ल्डकप जिंकायचे आहेत. तसेच या विजेत्या संघात आपण असावं असं त्याला वाटतं," असं उत्तर डिव्हिलिअर्सने दिलं. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा विक्रम मोडण्यापासून केवळ 2 शतकं दूर आहे. कोहलीने एकूण 77 शतकं झळकावली आहेत.