वर्ल्डकप स्पर्धेला अखेर सुरुवात झाली असून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना पार पडला. पण या सामन्याला अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. 1 लाख 32 हजारांची प्रेक्षकक्षमता असतानाही मैदानात फक्त 15 ते 17 हजार प्रेक्षक होते. सामन्यातील खेळाडूंच्या कामगिरीपेक्षाही रिकाम्या खूर्च्यांनी जास्त लक्ष वेधून घेतलं होतं. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकर ट्रॉफ घेऊन मैदानावर उतरला असता त्याच्या नावाचा जयघोषही झाला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर रिकाम्या मैदानाचे अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यावरुन बीसीसीआयच्या नियोजनावरही टीका करत आहे. भारत वगळता इतर सामन्यांना प्रेक्षकांची गर्दी होत नसल्याने अनेकांनी नाराजी जाहीर केली आहे. अनेकांनी याचं खापर बीसीसीआयवर फोडलं आहे. बीसीसीआयने अगदी शेवटच्या क्षणी तिकिटांची विक्री सुरु केल्याने ही वेळ आल्याचं त्यांचं म्हणणं आहे. 



वर्ल्डकपच्या तिकीटांची विक्री करणाऱ्या 'बुक माय शो' या संकेतस्थळावर बहुतांश सामन्यांच्या तिकीटांची विक्री झाल्याची नोंद आहे. बुधवारी संध्याकाळपर्यंत पहिल्या सामन्याच्या जवळपास सर्व तिकीटांची विक्री केल्याचं दाखवलं जात होतं. पण मैदानात मात्र चित्र अगदी वेगळं होतं. 



या सर्व वादादरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने बीसीसीआयला एक सल्ला दिला आहे. भारत वगळता इतर सामन्यासांठी शाळेच्या आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मोफत तिकीटं द्या असं तो म्हणाला आहे. सेहवागने एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. 


या पोस्टमध्ये सेहवागने लिहिलं आहे की, "कार्यालयीन वेळा संपल्यानंतर जास्त लोक येतील अशी आशा आहे. पण भारतीय संघ खेळत नसेल अशा सामन्यांची मोफत तिकिटं शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना द्यायला हवीत. 50 ओव्हर्सच्या खेळातील रस कमी होत असताना यामुळे तरुणांना मैदानात जाऊन वर्ल्डकप सामने आणि खेळाडूंना खेळताना पाहण्याचा अनुभव घेता येईल". 



वर्ल्डकपमध्ये बीसीसीआयच्या भोवती अशा प्रकारचा वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. बीसीसीआयने स्पर्धा सुरु होण्यापूर्वी 9 सामन्यांच्या तारखा बदलल्या असून, यामुळे गोंधळात भर पडली आहे. सुरुवातीला वेबसाइट क्रॅश झाल्यानंतर आणि अनेकांनी ऑनलाइन तिकिटांसाठी मोठ्या रांगा लागल्याची तक्रार केल्यानंतर बुक माय शोला अतिरिक्त तिकिटेही जारी करण्यात आली होती.