एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा विजयरथ कायम असून, आता इंग्लंड संघाशी भिडणार आहे. भारतीय संघाने सुरुवातीचे पाचही सामने जिंकले आहेत. इंग्लंडविरोधातही विजय मिळवून, भारतीय संघ विजयी षटकार मारण्याच्या प्रयत्नात असेल. दरम्यान, अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या जखमी असल्याने तो इंग्लंडविरोधातील सामन्यात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडविरोधातील सामन्यात हार्दिक पांड्याच्या जागी मोहम्मद शामीला संधी देण्यात आली होती. शामीने या संधीचं सोनं केलं असून, आता संघ निवडकर्त्यांसमोर मोठा पेचप्रसंग उभा केला आहे. त्यावर पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू वसीम अक्रमने मोठं विधान केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक पांड्या संघात नसतानाही भारतीय संघ चांगला दिसत असल्याचं वसीम अक्रमने म्हटलं आहे. बांगलादेशविरोधातील सामन्यात हार्दिक पांड्या जखमी झाला होता. गोलंदाजी करताना जखमी झालेला हार्दिक पांड्या उर्वरित सामना खेळू शकला नाही. तसंच न्यूझीलंडविरोधातील सामन्यातही त्याला विश्रांती देण्यात आली होती. पण हार्दिक पांड्या नसतानाही भारताने अत्यंत सहजपणे हे सामने जिंकले. 


"हार्दिक पांड्याशिवायही संघ चांगला दिसत आहे. जर तो आता फिट असेल तर चांगली बाब आहे," असं वसीम अक्रम स्पोर्ट्सक्रिडाशी बोलताना म्हणाले. न्यूझीलंडविरोधातील सामन्यात मोहम्मद शामीला पांड्याच्या जागी स्थान देण्यात आलं होतं. या सामन्यात मोहम्मद शामीने 10 ओव्हर्समध्ये 54 धावा देत 10 विकेट्स घेतल्या. 


"मोहम्मद शामीला संघातून वगळणं आता थोडं अवघड असणार आहे. मला वाटतं जर तो पूर्णपणे बरा झाला नसेल तर भारताने त्याला खेळवण्याचा धोका पत्करु नये. कारण पूर्ण बरं वाटत असलं तरी सामन्यात खेळताना स्नायू दुखावू शकतो. त्यामुळे जर तो 100 टक्के बरा झाला असेल तरच त्याला खेळवा," असं वसीम अक्रम म्हणाला आहे.


"प्लेइंग 11 मध्ये कोणत्याही खेळाडूला घेतलं तरी तो पूर्णपणे तयार असतो, याचं संपूर्ण श्रेय संघ व्यवस्थापनाला दिलं पाहिजे. मोहम्मद शामीचा चेंडू जमिनीवर आदळल्यानंतर तो कोणत्याही दिशेने वळू शकतो," असं कौतुक मोहम्मद शामीने केलं आहे. मोहम्मद शामीने न्यूझीलंडविरोधातील सामन्यात पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली आणि नंतर मागे वळून पाहिलं नाही. 


"तुम्ही वर्ल्डकपमध्ये आल्यानंतर लगेच गोलंदाजी करणं सोपं नाही. मोहम्मद शामी हा नवी चेंडूचा गोलंदाज आहे. जेव्हा पहिली ओव्हर मिळत नाही तेव्हा मला नवीन चेंडू का मिळाला नाही? असा विचार करत तुम्ही भावनिक होऊ शकता. पण तो अनुभवी आहे. जेव्हा कधी त्याला संधी मिळाली आहे त्याने देशाला विजय मिळवून दिला आहे," असं सांगत वसीम अक्रमने मोहम्मद शामीची पाठ थोपटली. 


भारत आणि इंग्लंड 29 ऑक्टोबरला भिडणार आहेत. लखनऊत हा सामना होणार आहे.