पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू वसीम अक्रमने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. रोहित शर्मा फलंदाजी फार सहज गोष्ट असल्याचं दर्शवतो असं वसीम अक्रमने म्हटलं आहे. रोहित शर्माने नेदरलँडविरोधातील सामन्यात अर्धशतक झळकावलं. भारताने लीगमधील हा शेवटचा सामना 160 धावांनी जिंकला. यासह भारताने सलग 9 सामने जिंकत रेकॉर्ड रचला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

A Sports शी संवाद साधताना वसीम अक्रमने म्हटलं की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मासारखा खेळाडू नाही. तो फलंदाजी फार सहज असल्याचं दाखवतो. रोहित शर्माने 54 चेंडूत 61 धावा ठोकल्या. यावेळी त्याने 8 चौकार आणि 2 षटकार ठोकले. 


"आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मासारखा खेळाडू नाही. आपण विराट कोहली, जो रुट, केन विल्यमसन आणि बाबर आझम यांच्याबद्दल सतत बोलत असतो. पण हा खेळाडू वेगळाच आहे. समोर कोणताही संघ असो किंवा गोलंदाजी असो, तो फलंदाजी फार सोपी गोष्ट असल्याचं दाखवतो," असं कौतुक वसीम अक्रमने केलं आहे.


या चर्चेत सहभागी असणारा पाकिस्तानचा माजी फलंदाज शोएब मलिकने वसीम अक्रमच्या या मताशी आपण सहमत असल्याचं सांगताना रोहित विरोधी संघाच्या सर्व गोलंदाजांवर तुटून पडतो असं सांगितलं. वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माने 9 सामन्यात 55.88 च्या सरासरीने 503 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 121.49 आहे. 


"रोहित शर्मा एक असा फलंदाज आहे, जो विरोधी संघातील सर्व पाचही गोलंदाजांना फटके लगावतो. वसीम अक्रमने ज्या फलंदाजांचं नाव घेतलं ते 3 ते 4 गोलंदाजांना टार्गेट करतो. पण रोहित सर्वच्या सर्व 5 गोलंदाजांच्या मागे जातो." अस वसीम अक्रम म्हणाला.


बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये झालेल्या सामन्यात रोहित शर्माने नेदरलँडविरोधात अर्धशतक झळकावलं. यादरम्यान रोहित शर्माने कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा ए बी डेव्हिलिअर्सचा (58) रेकॉर्ड मोडीत काढला. याशिवाय वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक शतकं ठोकणारा कर्णधारही ठरला. हा रेकॉर्ड इंग्लंडचा माजी कर्णधार मॉर्गनच्या नावे होता. त्याने 22 षटकार ठोकले होते.