मुंबई : आगामी ५० ओव्हरच्या वर्ल्ड कप स्पर्धेला मे महिन्यापासून सुरुवात होणार आहे. वर्ल्ड कप सुरु होण्यासाठी आजपासून अवघ्या १०० दिवसांचा अवधी शिल्लक आहे. वर्ल्ड कपची सगळ्याच क्रिकेट टीम आणि चाहते आवर्जून वाट पाहत असतात. या वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन यंदा इंग्लंड मध्ये करण्यात आले आहे. वर्ल्ड कपच्या दृष्टीकोनातून प्रत्येक टीमने कंबर कसायला सुरुवात केली आहे. इतर टीमच्या तुलनेत इंग्लंडची टीम ही बॉलिंग, बॅटींग या सर्व बाबतीत वरचढ ठरताना दिसत आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या मते वर्ल्ड कप जिंकण्याच्या शर्यतीत इंग्लंड आणि भारत या दोन टीमच प्रबळ दावेदार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा होणारा वर्ल्ड कप हा १२वा आहे. या आधीच्या वर्ल्ड कप स्पर्धेत अनेक रेकॉर्ड केले आहेत. आतापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेत १६५ शतकांची नोंद करण्यात आली आहे. यात सर्वाधिक शतके करण्याचा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी वर्ल्ड कपमध्ये २६ शतकं लगावली आहेत. तर त्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे. भारतीय बॅट्समननी वर्ल्ड कपमध्ये २५ शतकं केली आहेत. 


वर्ल्ड कपमधले काही रेकॉर्ड 


१. वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने वर्ल्ड कपमध्ये ६ शतकं लगावली आहेत. तर कुमार संगकारा आणि रिकी पाँटिंग प्रत्येकी ५-५ शतकांसह संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत.


२. वर्ल्ड कप मध्ये पहिली शतकी खेळी करण्याचा विक्रम इंग्लंडच्या डेनिस एमिसने यांनी केला होता. त्यांनी ७ जून १९७५ ला भारताविरुद्ध १३७ रनची खेळी केली होती.


३. भारताकडून वर्ल्ड कपमध्ये पहिले शतक माजी अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांनी केले होते. १९८३ च्या वर्ल्ड कपमध्ये झिंबाब्वेविरुद्ध कपिल देव यांनी १७५ धावांची खेळी केली होती.


४. सर्वात वेगवान शतक करण्याचा रेकॉर्ड आयर्लंडच्या केविन ओब्रायनच्या नावावर आहे. त्याने २०११च्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध ५० बॉलमध्ये शतक साजरे केले होते.  तसंच वेगवान दुहेरी शतक करण्याचा विक्रम क्रिस गेल याने केला आहे. त्याने २०१५ वर्ल्ड कपमध्ये झिंबाब्वेविरुद्ध १३८ बॉलमध्ये द्विशतक केले होते.


५. क्रिकेट विश्वातील ६ बॅट्समननी अंतिम सामन्यात शतक करण्याची कामगिरी केली आहे. या यादीत क्लाईव लॉयड, विवियन रिचर्ड्स, अरविंद डिसिल्वा, रिकी पाँटिंग, एडम गिलख्रिस्ट आणि महेला जयवर्धेने या बॅट्समनचा समावेश आहे.


६. १९९९ च्या वर्ल्डकप स्पर्धेत एकूण ११ शतकं लगावली गेली होती . यापैकी ५ शतके भारतीय बॅट्समनची होती. २ शतकं हे राहुल द्रविडने केली होती.


७. वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत एका इनिंगमध्ये सर्वाधिक रन करण्याचा विक्रम न्यूझीलंड टीमचा सलामीवीर मार्टिन गुप्टील च्या नावावर आहे. त्याने २०१५ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्टइंडिजविरुद्ध १६३ बॉलमध्ये तडाखेबाज २३७ धावांची खेळी केली होती.


८. वर्ल्ड कप स्पर्धेतील १०० वे शतक लगावण्याचा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने केला होता. हेडनने २००७ च्या वर्ल्ड कप मध्ये न्यूझीलंडविरुद्ध १०३ रनची शतकी खेळी केली होती. हे शतक वर्ल्डकप स्पर्धेतील १०० वे शतक ठरले.


९. एकाच वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक वैयक्तिक शतकं करण्याचा विक्रम कुमार संगकाराने केला आहे. संगकाराने २०१५ सालच्या वर्ल्ड कपमध्ये ४ शतकं केली होती. तसेच २००३ च्या वर्ल्ड कपमध्ये सौरव गांगुलीने तीन शतके लगावली होती.


१०. भारताच्या बॅट्समननी ११ वर्ल्ड कपपैकी ८ वर्ल्ड कप स्पर्धेत शतकं केली आहेत. १९७५, १९७९ आणि १९९२ ला झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत कोणत्याच भारतीय बॅट्समनला शतक करता आले नाही.