`मला ते बघवत नव्हतं, त्यांनी किती आणि..`; ड्रेसिंगरुममधल्या परिस्थितीबद्दल बोलताना द्रविड भावूक
World Cup Final Dressing Room Coach Rahul Dravid: रोहित शर्मा, मोहम्मद सिराज यांना मैदानातच अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. ड्रेसिंग रुममध्ये काय स्थिती होती हे राहुल द्रविडने सांगितलं आहे.
World Cup Final Dressing Room Coach Rahul Dravid: भारतीय क्रिकेट संघाने जीवतोड मेहनत करुन वर्ल्ड कप 2023 ची फायनल गाठली. मात्र शेवटच्या सामन्यात सलग 10 सामने जिंकणाऱ्या संघाने कच खाल्ली आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाचा पराभव झाला. या पराभवामुळे भारतीय खेळाडू फारच निराश झाले आहेत. आपल्याला एवढी मेहनत केल्यानंतरही वर्ल्ड कप जिंकता आला नाही याचं दु:ख भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं. कर्णधार रोहित शर्मा आणि मोहम्मद सिराजला मैदानातच अश्रू अनावर झाले. विराट कोहलीही मैदानातून बाहेर पडताना तोंड लपवूनच बाहेर पडला. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी असलेल्या राहुल द्रविडने जेव्हा तो ड्रेसिंग रुममध्ये गेला त्यानंतर समोर जे काही दिसलं ते पाहून धक्का बसल्याचं म्हटलं आहे. मला समोरची दृष्यं बघतव नव्हती. सर्वांचे चेहरे पडलेले होते. सर्वच खेळाडू फारच चिंतेत होते. आता करावं तर नेमकं करावं काय हे त्यांना समजत नव्हतं, असं द्रविडने म्हटलं आहे.
कठोर मेहनत केली पण...
वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने यजमान भारताला 6 विकेट्सने पराभूत केलं. सलग 10 सामने जिंकणाऱ्या भारताला नमवून वर्ल्ड कपमधील 9 वा विजय मिळवत थेट वर्ल्ड कपवर सहाव्यांदा नाव कोरलं. राहुल द्रविडने संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळाडूंनी केलेल्या मेहनतीवर पाणी फेरल्याचं मान्य केलं. खेळाडूंनी अनेक महिने या स्पर्धेसाठी फार मेहनत केली होती. 12 वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी कठोर मेहनत करुन लक्ष्याच्या एवढ्या जवळ पोहचल्यानंतर शेवटच्या सामन्यामध्ये अशी कच खाल्ल्याने ड्रेसिंग रुमची परिस्थिती फारच बिकट होती, असं राहुल द्रविडने म्हटलं.
इथं पोहोचण्यासाठी...
"तो (रोहित शर्मा) फारच निराश आहे. ड्रेसिंग रुममध्ये अनेक खेळाडू असेच निराश होते. ड्रेसिंग रुममध्ये जी परिस्थिती होती ती मला पहावत नव्हती. एक प्रशिक्षक म्हणून अशी परिस्थिती पाहणं फार कठीण असतं कारण मला ठाऊक आहे की इथपर्यंत पोहोचण्यासाठी या खेळाडूंनी किती मेहनत केली आहे. त्यांनी इथं येण्यासाठी किती योगदान दिलं आहे. काय काय गोष्टी त्यांनी इथपर्यंतच्या प्रवासाठी गमावल्या किंवा सोडल्या आहेत. त्यामुळेच हे असं काही पाहणं फार कठीण असतं," असं द्रविड म्हणाला.
त्याचे प्रयत्न मी स्वत: पाहिलेत
"एक कोच म्हणून हे सारं पाहणं फार कठीण असतं असं मला वाटतं कारण मी या खेळाडूंचा व्यक्तीगत स्तरावर ओळखतो. त्यांनी किती आणि काय काय प्रयत्न केले आहेत हे मी स्वत: पाहिलं आहे. आम्ही मागणी महिन्यात किती मेहनत घेतली, कशापद्धतीचं क्रिकेट खेळलो आहोत हे सारं डोळ्यासमोरुन गेलं. मात्र असं असलं तरी हा सारा खेळाचाच भाग आहे. त्या दिवशी उत्तम खेळणाऱ्या संघाला विजय मिळतो," असंही द्रविडने खेळाडूंच्या परिस्थितीबद्दल भाष्य करताना म्हटलं.
...तर तुम्ही शिकत नाही
"मला विश्वास आहे की उद्या पुन्हा सूर्य उगवेल. आम्ही यामधून नक्कीच शिकून बाहेर पडू. आम्ही यामधून नक्कीच पुढे जाऊ. माझं म्हणणं असं आहे की खेळाडू म्हणून तुम्हाला हेच करावं लागतं. खेळात तुम्हाला मोठं यश मिळतं तर कधीतरी खेळ म्हणजे खालच्या स्तराला जाणंही असतं. यातून तुम्ही पुढे जात राहता. आपण थांबता कामा नये. तुम्ही जोपर्यंत स्वत:ला झोकून देण्याची तयारी ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही अशा खेळांसाठी मैदानात उतरुन मोठं यश संपादन करु शकत नाही. यश मिळालं नाही तर तुम्हाला असे पराभव पचवण्याचा अनुभवही मिळत नाही. या साऱ्यातून तुम्ही गेला नाहीत तर तुम्ही काहीही शिकला नाहीत असं म्हणता येईल," असंही द्रविडने स्पष्ट केलं.