संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष लागून राहिलेली वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. दरम्यान वर्ल्डकपच्या पूर्वसंध्येला सर्व संघाचे कर्णधार Captains Meet च्या निमित्ताने एकत्र आले होते. अहमदाबादमध्ये आयोजित या कार्यक्रमात कर्णधारांनी त्यांचे संघ तसंच तयारी यावर भाष्य केलं. माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री आणि इऑन मॉर्गन या कार्यक्रमात समालोचन करत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कार्यक्रमात भारतीय कर्णधार रोहित शर्मा, ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा, बांग्लादेशचा कर्णधार शाकीब अल हसन, अफगाणिस्तानचा कर्णधार हसमतुल्लाह शाहिदी, नेदरलँडचा स्कॉट एडवर्ड्स आणि श्रीलंकेचा कर्णधार दासून हजर होते. या कार्यक्रमात एकूणच आगामी वर्ल्डकपचा उत्साह पाहण्यास मिळाला. 


रोहित शर्माच्या उत्तराने हास्यकल्लोळ


सर्व कर्णधारांनी यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरंही दिली. दरम्यान यावेळी रोहित शर्माला एक प्रश्न विचारला असता, त्याची प्रतिक्रिया पाहून पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमसह सर्वांनाच हसू अनावर झालं होतं. 


एका पत्रकाराने रोहित शर्माला 2019 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंडदरम्यान झालेल्या सामन्याबद्दल प्रश्न विचारला. या सामन्यात सुपर ओव्हर झाली असता सामना बरोबरीत सुटला होता. पण चौकाराच्या आधारे इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं होतं. त्यामुळे या नियमात बदल करावा का? अशी विचारणा रोहित शर्माला करण्यात आली. त्यावर रोहितने आपल्या नेहमीच्या स्टाइलने उत्तर दिलं आणि एकच हशा पिकला.


रोहितने उत्तर देताना प्रश्न ऐकून आश्चर्य वाटत असल्याचे हातवारे केले. नंतर म्हटलं की "काय यार! हे ठरवण माझं काम नाही". रोहितचं उत्तर ऐकल्यानंतर त्याच्यासह उपस्थित सर्व कर्णधार हसू लागले होते. 



पावसामुळे रद्द झालेल्या सराव सामन्यांवर रोहितने केलं भाष्य


रोहित शर्माला यावेळी पावसामुळे दोन्ही सराव सामने रद्द झाल्याने भारताची तयारीचा आढावा घेण्याची संधी हुकल्याबद्दल विचारण्यात आलं. यावर रोहित शर्माने मागील काही काळात भारतीय संघाने फार क्रिकेट खेळलं असल्याचं सांगितलं.


"आम्ही नाराज झालो नाही. खरं तर आम्हाला विश्रांती मिळाली याचा आनंद आहे. ऊन आणि इतर स्थिती पाहता आम्ही फार क्रिकेट खेळलो आहोत. आम्ही आशिया कपमध्ये 4 आणि ऑस्ट्रेलियाविरोधात 3 सामने खेळले. आम्ही नेमके कुठे आहोत याची कल्पना आहे. मला ते दोन्ही सामने खेळण्यास आवडलं असतं. पण जर हवामान असं असेल तर तुम्ही जास्त काही करु शकत नाही. खासकरुन जेव्हा तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करायचा असतो. आम्ही ज्याप्रकारे स्पर्धेत प्रवेश करत आहोत ते पाहून मी आनंदी आहे. खेळाडू चांगल्या स्थितीत दिसत आहेत," असं रोहित शर्माने सांगितलं.