मॅनचेस्टर : वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवला आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाचा तब्बल १२५ रननी विजय झाला आहे. २६९ रनचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा १४३ रनवर ऑल आऊट झाला. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या तर बुमराह आणि युझवेंद्र चहलला प्रत्येकी २ विकेट मिळाल्या. हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवने प्रत्येकी १-१ विकेट घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने क्रिस गेलच्या रुपात पहिली विकेट मिळाली. मोहम्मद शमीने वेस्ट इंडिजला लागोपाठ २ धक्के दिले. यानंतर वेस्ट इंडिजच्या लागोपाठ विकेट जातच राहिल्या. वेस्ट इंडिजकडून सुनील आंब्रीसने सर्वाधिक ३१ रन केले.


या मॅचमध्ये विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पण टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. स्कोअरबोर्डवर २९ रन असताना रोहित शर्मा (१८) आऊट झाला. यानंतर विराट आणि राहुलने टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण राहुल पुन्हा एकदा चांगल्या सुरुवातीनंतर माघारी परतला. राहुलने ६४ बॉलमध्ये ४८ रन केले.


कोहली आणि धोनी यांच्या अर्धशतकी खेळीमुळे वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडियाने २६८ रन केले आहेत. एमएस धोनीने ६१ बॉलमध्ये नाबाद ५६ रन केले, यामध्ये ३ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. कर्णधार विराट कोहलीने ८२ बॉलमध्ये ७२ रन केले. विराटने त्याच्या खेळीमध्ये ८ फोर लगावले.


राहुलची विकेट गेल्यानंतर केदार जाधव आणि विजय शंकर यांच्या रुपात टीम इंडियाला लागोपाठ दोन धक्के लागले. शेवटच्या काही ओव्हरमध्ये हार्दिक आणि धोनीने फटकेबाजी केल्यामुळे टीम इंडियाला २६८ रनपर्यंत मजल मारता आली. हार्दिकने ३८ बॉलमध्ये ४६ रन केले.


वेस्ट इंडिजकडून केमार रोचने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर जेसन होल्डर आणि शेल्डन कॉट्रेलला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या.


टीम इंडियाचं विजयी रेकॉर्ड कायम


या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया अजून एकही मॅच हरलेली नाही. पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाचे ११ पॉईंट्स आहेत. ६ पैकी ५ मॅचमध्ये टीम इंडियाचा विजय झाला, तर १ मॅच पावसामुळे रद्द झाली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या विजयानंतर टीम इंडिया सेमी फायनलच्या आणखी जवळ पोहोचली आहे. २ पॉईंट्स असलेली ऑस्ट्रेलिया याआधीच सेमी फायनलमध्ये दाखल झाली आहे. तर या पराभवानंतर वेस्ट इंडिज सेमी फायनलच्या रेसमधून बाहेर झाली आहे.