World Record Knock Fastest Century: टी-20 विश्वचषक स्पर्धा सुरु असतानाच दुसरीकडे टी-20 क्रिकेटमधील एका मोठा विक्रम एका भारतीय क्रिकेटपटूने मोडीत काढला आहे. अर्थात हा भारतीय वंशाचा क्रिकेटपटू दुसऱ्या देशाकडून खेळत असून त्याने जॅन-निकोल लोफ्टी एटॉन्सचा सर्वात कमी बॉलमध्ये शतक झळकावण्याचा विक्रम मोडला आहे. अवघ्या चार महिन्यांमध्ये हा विक्रम मोडीत निघाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सर्वात वेगवान शतकाचा विक्रम आपल्या नावावर करणाऱ्या या खेळाडूचं नाव आहे साहिल चौहान! 


गेलचा आयपीएलमधील विक्रमही मोडीत काढला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साहिल चौहान हा इस्टोनिया देशाकडून खेळतो. त्याने सोमवारी सायप्रसविरुद्धच्या सामन्यात अवघ्या 27 बॉलमध्ये शतक झळकावलं. कोणत्याही टी-20 क्रिकेट स्पर्धेमध्ये झळकावलेलं हे सर्वात वेगवान शतक ठरलं आहे. 2013 च्या इंडियन प्रिमिअर लीगमध्ये ख्रिस गेलने अवघ्या 30 चेंडूंमध्ये शतक झळकावून केलेला विक्रमही साहिलने मोडीत काढला आहे. तसेच एकाच खेळीत एकाच खेळाडूने सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रमही साहिलने या खेळीमधून आपल्या नावावर केला आहे. साहिलने आपल्या संपूर्ण खेळीत एकूण 18 षटकार लगावले आहेत. साहिल हा मूळचा भारतीय वंशाचा आहे.


अडखळत सुरुवात


इस्टोनिया आणि सायप्रसदरम्यान सहा सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. पहिले दोन्ही सामने इस्टोनियाने जिंकले असून तिसऱ्या सामन्यामध्ये साहिल चौहान पहिल्याच बॉलवर शून्य धावांवर बाद झाला. मात्र त्याच्या संघाने शेवटच्या ओव्हरमध्ये 197 धावांचं लक्ष्य पूर्ण करत सामना 3 विकेट्सने जिंकला. मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये साहिलने पाहिल्या सामन्याची कसरही भरुन काढली. प्रथम फलंदाजी करत सायप्रसच्या संघाने 191 वर 7 गडी बाद अशी धावसंख्या उभारली. इस्टोनियाच्या संघाची सुरुवात अगदीच अडखळत झाली. पहिल्या 8 बॉलमध्ये संघाची धावसंख्या 9 वर असताना दोन्ही सलामीवीर तंबूत परतले. 


14 बॉलमध्ये अर्धशतक अन् षटकारांचा पाऊस


त्यानंतर, फलंदाजीला आलेल्या साहिलने आपल्या पहिल्या 3 बॉलमध्येच 6,4,6 अशा एकूण 16 धावा काढल्या. मात्र दुसरीकडे इस्टोनियाने आणखीन 2 विकेट्स गमावल्याने धावसंख्या सात ओव्हरनंतर 89 वर 4 बाद अशी झाली. मात्र तोपर्यंत साहिलने 17 बॉलमध्ये 66 धावांपर्यंत मजल मारली होती. त्याने 3 षटकार आणि 5 चौकार लगावले होते. सहाव्या ओव्हरपासूनच साहिलने सायप्रसरच्या गोलंदाजांची धुलाई सुरु केली. त्याने मंगला गुनशेखराच्या गोलंदाजीवर एकाच ओव्हरमध्ये 4 षटकार आणि एक चौकार लगावत अवघ्या 14 बॉलमध्ये अर्थशतक झळकावलं. त्यानंतर साहिल चौहान केवळ षटकार मारत होता असं म्हटलं तरी चुकीचं ठऱणार नाही.



351.21 च्या सरासरीने धुलाई


आठव्या ओव्हरमध्येही साहिलने 4 षटकार लगावले. त्यानंतर 9 व्या ओव्हरमध्ये पुन्हा 3 षटकार लगावले. यापैकी शेवटच्या षटकारासहीत त्याने शतक पूर्ण केलं. साहिलच्या तुफान फटकेबाजीमुळे 13 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर इस्टोनियाने सामना जिंकला. साहिलनेच चौकार लगावत विजय मिळवून दिला. साहिलने 351.21 च्या सरासरीने धावा केल्या.