साऊथम्पटन : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड 18-22 जून दरम्यान (ICC World Test Championship Final) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंजिक्यपदासाठी आमनेसामने भिडणार आहेत. टीम इंडिया आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) आयसीसी कसोटी क्रमवारीत (Icc Test Ranking) अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा अंतिम सामना इंग्लंडमधील साऊथम्पटनमध्ये (Southampton) खेळवण्यात येणार आहे. आधी या अंतिम सामन्याचे आयोजन क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर खेळवण्यात येणार होता. मात्र कोरोनामुळे हा सामना साऊथम्पटनमध्ये शिफ्ट करण्यात आला. हा सामना साऊथम्पटनमध्ये खेळवण्यात येणार असल्याने टीम इंडियाच्या चिंतेत भर पडली आहे. त्या मागचं कारणही तसंच आहे. टीम इंडियाला आतापर्यंत एकदाही साऊथम्पटनमध्ये सामना जिंकता आलेला नाही. टीम इंडियासाठी साऊथम्पटनमध्ये 2 कटू आठवणी आहेत. (world test Championship final 2021 team india test match record in Southampton)    


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीच्या नेतृत्वात 2014 मध्ये पराभव   


टीम इंडिया 2014 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर होती. तेव्हा भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा महेंद्रसिंह धोनीकडे होती. तेव्हा (Virat Kohli) विराट कोहलीही या प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. 5 सामन्यांच्या मालिकेतील हा तिसरा सामना होता. इंग्लंडने पहिले बॅटिंग करताना 567 धावांचा डोंगर उभारला होता. यामध्ये गॅरी बॅलन्स आणि इयन बेल या जोडीने वैयक्तिक शतकी खेळी केली होती. तर एलिस्टर कुकने 95 धावा केल्या होत्या. प्रत्युतरात भारताने पहिल्या डावात 330 धावा केल्या. यामध्ये अजिंक्य रहाणे आणि धोनीच्या अर्धशतकाचा समावेश होता. दोघांना चांगली सुरुवात मिळाली. पण या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आले नाही. यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डाव 205-4 धावा असताना डाव घोषित केला. यामुळे धोनी ब्रिगेडला विजयासाठी 445 धावांचे आव्हान मिळाले.  


भारताला विजयासाठी 445 धावांचे आव्हान


इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी तगडं आव्हान दिलं होतं. पण अजिंक्य रहाणेचा अपवाद वगळता इतर भारतीय फलंदाजांनी सपशेल निराशा केली. रहाणेने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा या जोडीला दुहेरी आक़डाही गाठता आला नाही. तर विराटने पहिल्या डावात 39 तर दुसऱ्या इनिंगमध्ये  28 रन्स केल्या. भारताला 266 धावांच्या मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने ही मालिका 3-1 च्या फरकाने जिंकली.      


भारताचा विराटच्या नेतृत्वातही साऊथम्पटनमध्ये पराभव


यानंतर टीम इंडियाने 2018 मध्ये कसोटी सामना खेळला. यावेळेस विराट टीम इंडियाचा कॅप्टन होता. या मालिकेतील हा चौथा सामना होता. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला पहिल्या डावात 246 धावांवर रोखलं. आता वेळ होती फलंदाजांची. चेतेश्वर पुजाराने 132 धावांची शानदार शतक खेळी केली. पण इतर फलंदाजांनी घोर निराशा केली. परिणामी भारताला आघाडी घेता आली नाही.     


इंग्लंड दुसऱ्या डावात बॅटिंगसाठी आली. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडला 271 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताला विजयाासाठी 245 धावांचे आव्हान मिळाले. विराटसेनेकडे 2014 च्या साऊथम्पटनमधील पराभवाची परतफेड करण्याची नामी संधी होती. पण ज्याची भीती होती तेच झालं. 


कॅप्टन विराट आणि अजिंक्य या दोघांव्यतिरिक्त इतर कोणालाही मोठी खेळी उभारता आली नाही. विराटने 58 तर रहाणेने 51 धावा केल्या. तर केएल राहुल आणि टेस्ट स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजारा आऊट झाले. मधल्या फळीतील फलंदाजांनी घोर निराशा केली. भारतीय संघाचा डाव 184 धावांवर आटोपला. अशा प्रकारे इंग्लंडने हा सामना 60 धावांनी जिंकला.


त्यामुळे विराटकडे आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामना जिंकून धोनी आणि स्वत:च्या पराभवाचा वचपा घेण्याची संधी आहे. यामुळे विराटसेना या मैदानात न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारत अजिंक्यपद मिळवणार की न्यूझीलंड बाजी मारणार, याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष असणार आहे.