अहमदाबाद : भारतामध्ये जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम बांधलं जात आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये असलेल्या सरदार पटेल स्टेडियमची पुनर्बांधणी सुरु आहे. या पुनर्बांधणीचे काही फोटो गुजरात क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष परिमल नथवानी यांनी ट्विट केले आहेत. अहमदाबादच्या या क्रिकेट स्टेडियममध्ये तब्बल १.१ लाख प्रेक्षक बसू शकणार आहेत. एवढी प्रेक्षक क्षमता असलेलं हे जगातलं हे सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम असेल. सध्या ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सर्वाधिक ९० हजार प्रेक्षक बसू शकतात. तर कोलकात्याचं ईडन गार्डन ६६,००० प्रेक्षक क्षमतेसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. १८५३ साली मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड बांधण्यात आलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम, मेलबर्नपेक्षाही मोठं, गुजरातमधल्या अहमदाबाद मोटेरामध्ये या स्टेडियमचं बांधकाम सुरु आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या स्टेडियमचं बांधकाम पूर्ण झाल्यावर भारताचा अभिमान आणखी वाढेल, असं ट्विट गुजरात क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष परिमल नथवानी यांनी केलं आहे. 



जानेवारी २०१८ मध्ये या स्टेडियमचं भूमीपूजन झालं होतं. गुजरात क्रिकेट असोसिएशननं लार्सन ऍण्ड टर्बो (एल ऍण्ड टी) या कंपनीला हे स्टेडियम बांधण्याचं कंत्राट दिलं. हे स्टेडियम बांधण्यासाठी शापूरजी पालनजी आणि नागार्जून कन्स्ट्रक्शन या दोन कंपन्यांनीही अर्ज केले होते. जगप्रसिद्ध आर्किटेक्चर फर्म एमएस पॉप्युलसनं या स्टेडियमचं डिझाईन केलं आहे. याच फर्मनं मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडचंही डिझाईन केलं होतं.


हे स्टेडियम उभारण्यासाठी अंदाजे ७०० कोटी रुपयांचा खर्च आला आहे. हे नवं क्रिकेट स्टेडियम ६३ एकर परिसरात पसरलं आहे. या स्टेडियममध्ये ५० रूम असलेलं क्लब हाऊस, ७६ कॉरपोरेट बॉक्स, ४ ड्रेसिंग रूम, क्रिकेटपटूंसाठी ३ प्रॅक्टिस ग्राऊंड, इनडोर क्रिकेट अॅकेडमी, ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल, ३ हजार चारचाकी आणि १० हजार दुचाकींसाठी पार्किंगची व्यवस्था असेल.


गुजरात क्रिकेट असोसिएशननं दिलेल्या माहितीनुसार अहमदाबादमध्ये जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम बांधायचं हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वप्न होतं. याआधी अहमदाबादच्या या स्टेडियममध्ये एकावेळी जास्तीत जास्त ५४ हजार प्रेक्षक बसू शकत होते. त्यामुळे गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१३ साली जगातलं सगळ्यात मोठं स्टेडियम बांधण्याची इच्छा व्यक्त केली. २०१४ साली मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शाह गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी मोदींचं हे स्वप्न पूर्ण करायला सुरुवात केली.


हे स्टेडियम उभारताना ट्रॅफिकच्या समस्येवरही उपाययोजना करण्यात आली आहे. ट्रॅफिक समस्या होऊ नये अशाच पद्धतीनं हे स्टेडियम बांधण्यात आलं आहे. जुन्या स्टेडियममध्ये मॅच असेल तर मोटेरा ते साबरमती या मुख्य मार्गावर ट्रॅफिकचा मोठ्या प्रमाणावर ताण येत होता. नव्या स्टेडियममुळे हा ट्रॅफिक ३ ठिकाणी वळवला जाणार आहे.


मोटेरा स्टेडियमचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर गुजरातमध्ये विश्व विक्रम केलेली दोन ठिकाणं होतील. याआधी ऑक्टोबर २०१८ मध्ये सरदार पटेल यांच्या १८२ मीटर उंच पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. सरदार पटेल यांचा हा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' जगातला सगळ्यात उंच पुतळा आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटाला रोज ३० हजार पर्यटक भेट देतात.


मोटेरा स्टेडियमचा इतिहास


१९८३ साली मोटेरा स्टेडियम बांधण्यात आलं होतं. १९८७ साली सुनिल गावसकर यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये १० हजार रन याच मैदानात पूर्ण केल्या. त्यावेळी टेस्ट क्रिकेटमध्ये १० हजार रन पूर्ण करणारे गावसकर हे पहिले क्रिकेटपटू बनले. यानंतर ७ वर्षांनी कपिल देव यांनी रिचर्ड हॅडलींचा ४३१ विकेटचा विश्वविक्रम मोडीत काढला. १९९९ साली सचिन तेंडुलकरनं त्याच्या टेस्ट कारकिर्दीतलं पहिलं द्विशतक याच मैदानात केलं होतं.


१९८२ साली बांधण्यात आलेल्या या मैदानाची प्रेक्षक क्षमता ४९ हजार एवढी होती. १९८३ साली या मैदानात भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये पहिली टेस्ट मॅच खेळवण्यात आली.