Vinesh Phogat : 2032 पर्यंत खेळणार... निवृत्तीच्या निर्णयावरून विनेश फोगटचा यूटर्न? भावनिक पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाली?
विनेशने अपात्रतेची कारवाई झाल्यावर कुस्तीतून आपण निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले होते. मात्र आता विनेशने पुन्हा एकदा पोस्ट लिहून ती 2032 पर्यंत कुस्ती खेळणार असल्याचे संकेत दिले आहेत.
Vinesh Phogat Emotional Post : भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हिला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून अखेर रिकाम्या होतीच भारतात परतावं लागणार आहे. ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 50 किलो वजनी गटाची अंतिम फेरी गाठणाऱ्या विनेशला केवळ 100 ग्रॅम वजन जास्त असल्याने अपात्र ठरवण्यात आले होते. त्यानंतर तिला रौप्य पदक तरी देण्यात यावे यासाठी क्रीडा लवादाकडे याचिका करण्यात आलेली होती. मात्र ही याचिका क्रीडा लवादाने फेटाळली. विनेशने अपात्रतेची कारवाई झाल्यावर कुस्तीतून आपण निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले होते. मात्र आता विनेशने पुन्हा एकदा पोस्ट लिहून ती 2032 पर्यंत कुस्ती खेळणार असल्याचे संकेत दिले आहेत.
विनेश फोगटने सोशल मीडियावर तीन पानांची पोस्ट शेअर केली. ज्यात तिने तिच्या बालपणीपासून ते आतापर्यंतचा संघर्ष सांगितला, तसेच भविष्यातील योजनांविषयी सुद्धा भाष्य केले. विनेशने पोस्टच्या सुरुवातीला आपल्या वडिलांची आशा आणि आईच्या संघर्षाचा उल्लेख केला तसेच पती सोमवीर याला आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक चढ उतारात साथ देण्याचे श्रेय दिले.
विनेशने पोस्टच्या शेवटच्या भागात लिहिलेला मजकुर फार महत्वाचा होता. यात तिने लिहिले की, "मी फक्त एवढंच बोलू इच्छिते की आम्ही हार मानली नाही, आमचे प्रयत्न थांबले नाहीत. पण घड्याळ थांबलं आणि वेळ चुकीची होती. माझ्या नशिबात कदाचित हेच होतं, माझी टीम, माझ्या सोबत असलेले देशवासी, माझं कुटुंब यांना वाटतं की ज्या लक्षासाठी आम्ही काम करत होतो, आणि जे मिळवण्यासाठी योजना आखात होतो ते अपूर्ण राहिलं. नेहमी काही ना काही कमतरता राहू शकते आणि गोष्टी पूर्वी सारख्या होऊ शकत नाहीत.
विनेशने पुढे म्हंटले की, "असू शकतं की वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये मी स्वतःला 2032 पर्यंत खेळताना पाहू शकेन, कारण माझ्या आत अजूनही संघर्ष आणि कुस्ती शिल्लक आहे. भविष्यात माझ्यासाठी काय लिहिले आहे याविषयी मी भविष्यवाणी करू शकत नाही. पण मला विश्वास आहे की ज्या गोष्टींवर मी विश्वास करते अशा गोष्टींसाठी मी नेहमी लढत राहीन".
विनेश प्रशिक्षक आणि डॉक्टरांबद्दल काय म्हणाली :
विनेश फोगटने आपले प्रशिक्षक आणि पॅरिसमध्ये भारताच्या 13 सदस्यीय मेडिकल स्टाफचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. पारदीवाला यांची सुद्धा पाठराखण करून कौतुक केले. विनेश 100 ग्राम वजनामुळे अपात्र राहिल्याने तिला तिचे प्रशिक्षक आणि डॉक्टर स्टाफवर सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित करून टीका करण्यात येत होती. तेव्हा विनेशने आपल्या पोस्टमध्ये त्यांच्या सहकार्याबाबत आभार व्यक्त केले. विनेश म्हणाली, "कोच वोलेर अकोस यांना 'असंभव' या शब्दावर विश्वास नाही. तर डॉ. दिनशॉ पारदीवाला हे देवदूताप्रमाणे आहेत.