पुणे : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा इनिंग आणि १३७ रननी विजय झाला आहे. भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा हा सगळ्यात मोठा विजय आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाच्या बॅट्समनबरोबरच बॉलर आणि फिल्डरनीही उल्लेखनीय कामगिरी केली. ६०१/५ या स्कोअरवर टीम इंडियाने डाव घोषित केला. यानंतर भारतीय बॉलरनी दक्षिण आफ्रिकेचा २७५ रनवर ऑल आऊट केला आणि फॉलो-ऑन दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फॉलो-ऑन मिळाल्यानंतर पुन्हा बॅटिंगला आलेल्या दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीलाच धक्के लागले. ईशांत शर्माने एडन मार्करमला शून्य रनवर माघारी पाठवलं. पहिल्या इनिंगमध्येही मार्करम शून्य रनवर आऊट झाला होता.


उमेश यादवने भारताला दुसरी विकेट मिळवून दिली. उमेश यादवच्या बॉलिंगवर थियुनिस डे ब्रुयनचा अफलातून कॅच विकेट कीपर ऋद्धीमान सहाने पकडला. ऋद्धीमान सहाने क्षणाचाही विलंब न लावता उडी मारून डाव्या हातात हा कॅच पकडला. ऋद्धीमान सहाचा हा कॅच सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



उमेश यादवने पहिल्या इनिंगमध्येही थियुनिस डे ब्रुयनची विकेट घेतली होती. तेव्हाही ब्रुयनने ३० रनवर ऋद्धीमान सहालाच कॅच दिला होता. बऱ्याच कालावधीनंतर ऋद्धीमान सहा टीम इंडियाकडून खेळत आहे. वर्षभरापूर्वी दुखापत झाल्यानंतर सहा टीमच्या बाहेर होता. त्यामुळे ऋषभ पंतला संधी देण्यात आली होती. पण ऋषभ पंतचा खराब फॉर्म पाहता टीमने पुन्हा एकदा सहावर विश्वास दाखवला.