दहावी बोर्डाच्या परीक्षेत विराट कोहलीवर विचारला १० गुणांचा प्रश्न
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली हा क्रिकेटमध्ये नव-नवे रेकॉर्ड्स करत असतो. आपल्या शानदार खेळीने आणि स्टाईलने विराटने अवघ्या तरुणाईला वेड लागलं आहे.
नवी दिल्ली : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली हा क्रिकेटमध्ये नव-नवे रेकॉर्ड्स करत असतो. आपल्या शानदार खेळीने आणि स्टाईलने विराटने अवघ्या तरुणाईला वेड लागलं आहे. मात्र, आता याच विराट कोहलीने १०वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षाही खास बनवली आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...
पुन्हा कोहलीचीच चर्चा
पश्चिम बंगालमध्ये एसएससी म्हणजेच १०वी बोर्डाच्या परीक्षेत चक्क विराट कोहली संदर्भात प्रश्न विचारण्यात आला आहे. बोर्डाच्या परीक्षेत विराटवर प्रश्न विचारण्यात आल्याने आता पुन्हा एकदा सर्वत्र कोहलीची चर्चा सुरु झालीय.
विद्यार्थ्यांना बसला एकच झटका
परीक्षेत विराट कोहलीवर प्रश्न विचारण्यात आल्याने विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्काही बसला आणि आनंदही झाला. प्रश्न विचारण्यात आल्याने आधी विद्यार्थ्यांना एकच झटका बसला. मात्र, आपल्या आवडत्या क्रिकेटरसंदर्भात प्रश्न असल्याने विद्यार्थ्यांनीही आनंदात त्याचं उत्तर दिलं.
बोर्डाच्या परीक्षेत विराटवर प्रश्न
पश्चिम बंगालमध्ये सध्या १०वी बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. या परीक्षेत इंग्रजीच्या प्रश्न पत्रिकेत विराट कोहलीवर प्रश्न विचारण्यात आला आहे. हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये विराट कोहलीवर एक निबंध लिहिण्यास सांगितलं होतं.
विद्यार्थ्यांसाठी एक लॉटरीच
विराट कोहलीचं आयुष्य आणि क्रिकेट करिअर संदर्भात विद्यार्थ्यांना निबंध लिहायचा होता. हा प्रश्न पाहून विद्यार्थ्यांना खूपच आनंद झाला आणि त्यांनी आपल्या आवडत्या क्रिकेटरवर निबंध लिहीला. हा निबंध म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक लॉटरीच म्हणावी लागेल कारण, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल याची विद्यार्थ्यांनी कल्पनाही केली नव्हती.
जर पॉईंट्स दिले नसते तर...
मिदनापुर मिशन गर्ल्स स्कूलची विद्यार्थीनी श्रेयस घोषालने सांगितले की, "विराट कोहलीवर विचारण्यात आलेला हा प्रश्न १० गुणांचा होता. प्रश्न पत्रिकेत देण्यात आलेल्या पॉईंट्सच्या आधारे आम्हाला कोहलीवर लिहायचं होतं. तसं पहायला गेलं तर विराट इतका लोकप्रिय आहे की जर पॉईंट्स दिले नसते तरीही विद्यार्थ्यांनी उत्तर सहज लिहीलं असतं."