क्रिकेट समीक्षक रवि पत्की, झी मीडिया, मुंबई: 144 वर्षांच्या कसोटी इतिहासाचे सुवर्णपान लिहायला भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ सज्ज झाले. एकवेळ एडिसनचा बल्ब पहिल्या झटक्यात लागला असता पण टॉसची लॉटरी कोहलीला कधी लागणार काय माहीत. ढगाळ हवा आणि वाहणारा वारा हे स्विंग बॉलिंगच्या पाककृती करता  लागणारे परफेक्ट जिन्नस निसर्गाने वाढून ठेवलेले असताना न्यूझीलंड ने बॉलिंग घेतली नसती तरच नवल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाच स्विंग बॉलर्स बरोबर घेऊन न्यूझीलंड मैदानात उतरला. पण शेवटी गोलनदाज माणसेच आहेत मशीन्स नाहीत. सगळ्या कंडिशन्स अनुकूल असल्या तरी प्रत्येक वेळेस पहिल्या चेंडूपासून दिशा आणि लेंथ अचूक येईलच असे नसते. त्या ढगाळ हवेला न्याय देईल असा ड्रीम चेंडू पडायला न्यूझीलंडला 28 चेंडू लागले.


पाचव्या ओवर मध्ये साउदीचा चौथा चेंडू unplayable धाटणीतला outswing पडला.तोपर्यंत लेग स्टंप च्या बाहेर,ऑफस्तंप च्या बऱ्याच बाहेर असे चेंडू पडले होते.त्यामुळे रोहित आणि गिल यांचा आत्मविश्वास वाढला. त्यातच स्विंग बोथट करायला क्रिझच्या पुढे येऊन खेळायचे हा गृहपाठ प्रत्यक्षात उतरवण्याचे धाडस वाढले आणि त्या अवघड परिस्थिती दोघांनी फार त्रास न होता 62 धावांचा स्टार्ट दिला.


गिल, रोहित, कोहली ह्यांनी फ्रंट फूट खूप पुढे ठेऊन इंग्लिश परिस्थितीत batting चा वस्तुपाठ दिला. ह्या धोरणा बद्दल बॅटिंग कोच विक्रम राठोडला तसेच संघातील इंग्लडमधल्या परिस्थिचा अनुभव असणाऱ्या बॅट्समनला श्रेय जाते. 


विक्रम राठोडचा स्वतःचा डेब्यू इंग्लंडमधला आणि तिथल्या तीन कसोटी सामन्यात त्याला स्विंगने डोळ्यासमोर तारे चमकवले होते. त्यामुळे इंग्लंडमध्ये काय नाही केले पाहिजे हे तो बरोबर बॅट्समन ला सांगू शकला असेल.रहाणेने सुद्धा स्टान्स मध्ये बदल करून थोडा चेस्ट ऑन केला आहे.त्यामुळे बोल्ट आणि वॅगनेरचे इन्सविंग त्याला लेट खेळता येणे शक्य झाले आहे.


146 ला तीन हा धावफलक समाधान देणारा आहे.पण त्या कंडिशन्स मध्ये पंत, जडेजा,अश्विन किती योगदान देऊ शकतील हा प्रश्नच आहे.त्यामुळे कोहली रहाणे जोडीला डोळ्यात घातलेले तेल थोड़ेही कमी करून चालणार नाही. सामन्याच्या आत्ता 65 ओवर्स झाल्या आहेत. त्यामुळे लगेच कुठली भाकिते न करता प्रत्येक चेंडूचा आनंद घेऊ. 


सामन्याच्या दिशेचा काही अंदाज आजचा खेळ संपेल तेव्हा येऊ शकेल. पण स्विंग विरुद्ध एक धोरण ठरवून ते अमलात आणल्या बद्दल भारतीय बॅट्समनचे कौतुक करायला हवे. चैम्पियंसची ओळख ते किती सामने जिंकतात त्या इतकीच ते परिस्थितिषी जुळवून घेण्याकरता किती आणि कसा ग्रहपाठ करतात ह्या मध्ये असते.