WTC 2023 Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (World Test Championship) ऑस्ट्रेलिया (Australia) भक्कम स्थितीत असून भारताची स्थिती मात्र अत्यंत बिकट दिसत आहे. दोन दिवसांचा खेळ संपला असून सध्या तरी ऑस्ट्रेलिया संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं दिसत आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 469 धावांचा डोंगर उभा केला असून, भारत मात्र 151 धावांवर 5 बाद अशा स्थितीत आहे. यामुळे भारतावर फॉलो-ऑनचं संकट आहे. भारताचा स्टार खेळाडू आणि विराट कोहलीदेखील (Virat Kohli) मोठी खेळी करु शकला नाही. मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) टाकलेला चेंडू विराट खेळू शकला नाही. कोहली फक्त 14 धावा करु शकला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावसकर म्हणाले की, लंडनमधील ओव्हल येथे सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या दिवशी जर विराट कोहली बॅकफूटवर खेळण्यास तयार असता तर मिशेल स्टार्कने टाकलेल्या बाऊन्सरला तो अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकला असता.


विराट कोहली बाद झाल्यानंतर अनेकांनी मिचेल स्टार्कचा चेंडू खेळणं अजिबात शक्य नव्हतं असं म्हटलं. तर स्टीव्ह स्मिथने हा फार कठीण चेंडू होता असं म्हटलं आहे. 


विराट कोहली मैदानावर आला तेव्हा फार चांगल्या स्थितीत दिसत होता. आयपीएलमध्ये शतकं ठोकणारा विराट कोहली मैदानावर आत्मविश्वासाने खेळत होता. 19 व्या ओव्हरमध्ये आऊट होण्याआधी त्याने काही उत्तम फटके लगावले होते. पण स्टार्कने टाकलेल्या बाऊन्सरमुळे विराट आश्चर्यचकित झाला आणि चेंडू बॅटला लागून थेट स्टीव्ह स्मिथच्या हातात गेला. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिगने स्टार्क मागील अनेक काळापासून या चेंडूसाठी सराव करत होता अशी माहिती दिली आहे. 


कोहली फ्रंट फूटवर खेळत होता. त्यामुळे त्याला हा चेंडू खेळण्यासाठी जास्त विचार करण्यास वेळ मिळाला नाही. अन्यथा तो हा चेंडू खेळण्याऐवजी सोडू शकला असता असं गावसकरांनी सांगितलं आहे. अशाप्रकारच्या चेंडूवर कसं खेळलं पाहिजे असं सुनील गावसकर यांनी विचारण्यात आलं असता त्यांनी स्टार स्पोर्टला सांगितलं की, "बॅटफूटवर"


"तुम्ही नीट पाहिलं तर आज आज प्रत्येक ओव्हरला दोन बाऊन्सर टाकले जात आहेत. अनेक फलंदाज फ्रंट फूटवर खेळत आहेत. याचा अर्थ ते बॅकफूटवर जाऊ शकत नाहीत आणि स्वत:ला काही अतिरिक्त यार्ड देऊ शकत नाहीत ज्यामुळे ते चेंडू सोडू शकतात," असं सुनील गावसकरांनी सांगितलं आहे.


"हो, तो खेळण्यासाठी एक कठीण चेंडू होता. तो फ्रंट फूटवर असल्याने शेवटच्या क्षणी तो बॅट खाली घेऊ शकला नाही. जर तो बॅकफूटवर असता तर शक्य होतं. हा चेंडू खेळणं अशक्य होतं. पण बॅकफूटवर असता तर मनगट खाली घेता आलं असतं," असं सुनील गावसकर म्हणाले.


भारताची सुरुवात चांगली झाली होती. भारताने एकही गडी न गमावता 30 धावा केल्या होत्या. शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली होती. पण 6 व्या ओव्हरमध्ये रोहित शर्मा 14 धावांवर बाद झाला. यानंतर मात्र भारताच्या विकेट्सची रांग लागली. शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा दोघांनाही चेंडू कळला नाही. त्यांचा त्रिफळा उडाला. 


रवींद्र जाडेजा आणि अजिंक्य रहाणे यांनी 71 धावांची भागीदारी केली आहे. दिवस संपण्याआधी जाडेजा बाद झाला असून 151 धावांवर 5 गडी बाद अशी स्थिती आहे. भारत अद्याप 318 धावांनी पिछाडीवर आहे.