पदार्पण करणाऱ्या यशस्वीची ICC Test Ranking मध्ये मोठी झेप; रोहित, सिराजचंही `प्रमोशन`
ICC Test Rankings Yashasvi Jaiswal, Siraj, Rohit Sharma: वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीनंतर भारताच्या एकूण 3 खेळाडूंनी मोठी झेप घेतल्याचं पहायला मिळत आहे. यामध्ये रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल आणि मोहम्मद सिराजचा समावेश आहे.
ICC Test Rankings Yashasvi Jaiswal, Siraj, Rohit Sharma: आयसीसीच्या कसोटी क्रमवारीमध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, कसोटीमध्ये पदार्पण करणारा यशस्वी जयसवाल आणि मोहम्मद सिराजने मोठी झेप घेतली आहे. बुधवारी आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली. रोहित शर्माने दुसऱ्या कसोटीमध्ये पहिल्या डावात 80 तर दुसऱ्या डावात 57 धावांची खेळी कली. रोहितने या मालिकेतील कामगिरीच्या जोरावर फलंदाजांच्या क्रमवारीमध्ये 9 व्या स्थानी झेप घेतली आहे. या क्रमवारीमध्ये रोहित भारतीय फलंदाजांमध्ये अव्वल स्थानी आहे. भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतची एका स्थानाने घसरण झाली आहे. पंत या क्रमवारीमध्ये 12 व्या स्थानी आहे. पंतच्या नावावर 743 गुण आहेत. विराट कोहली 14 व्या स्थानी असून त्याच्या नावावर 733 अंक आहेत.
यशस्वीची भन्नाट कामगिरी
कसोटीमध्ये पदार्पण करणारा यशस्वी जयसवालही या क्रमवारीमध्ये असून त्याने कसोटी क्रिकेटमध्ये दमदार एन्ट्री घेतल्याचं दोन्ही सामन्यांमध्ये पहायला मिळालं. यसवाल हा 63 व्या स्थानी आहे. वैयक्तिक स्तरावर त्याची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने 10 स्थानांनी झेप घेतली आहे. यशस्वीने दुसऱ्या कसोटीमध्ये 57 आणि 38 धावा केल्या. यशस्वीने आपल्या पहिल्याच कसोटीमध्ये शतक झळकावलं होतं. पाकिस्तानचा शौहद शकिलने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीमध्ये द्विशतक झळकावलं आहे. शौहदने 12 स्थानांनी झेप घेतली असून तो 15 व्या स्थानी आहे. त्याने या क्रमवारीमध्ये मिळवलेलं हे सर्वोच्च स्थान आहे.
फलंदाजांमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंची चांगली कामगिरी
फलंदाजांच्या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाचा उजव्या हाताचा फलंदाज मार्नस लाबुशेनने 3 स्थानांनी झेप घेत दुसरं स्थान पटकावलं आहे. त्याने ओल्ड ट्रॅफोर्डमधील कसोटीमध्ये शतक झळकावलं होतं. तर इंग्लडचा जो रुट हा तिसऱ्या स्थानी आहे. हॅरी ब्रुक 11 व्या स्थानी आहे. तर झॅक क्लॉर्वे हा 13 व्या स्थानी आहे. झॅक पूर्वी 35 व्या स्थानी होती. दमदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडच्या फलंदाजांनी चांगलीच झेप घेतल्याचं क्रमवारीमध्ये दिसत आहे.
मोहम्मद सिराजचीही झेप
भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यानची दुसरी कसोटी अनिर्णित राहिल्याने भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला ही फायदा झाला असून त्याने गोलंदाजांच्या क्रमवारीमध्ये सर्वात उत्तम कामगिरी केली आहे. सिराजने 33 व्या स्थानी झेप घेतली आहे. सिराजने दुसऱ्या कसोटीमधील पहिल्या डावात वेस्ट इंडिजच्या 5 गड्यांना तंबूत पाठवलं होतं. गोलंदाजांच्या यादीमध्ये रवीचंद्रन अश्वीन पहिल्या स्थानी असून रविंद्र जडेजा सहाव्या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज रबाडा हा दुसऱ्या तर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सन हा तिसऱ्या स्थानी आहे.