U19 वर्ल्डकप: कधी मुंबईत पाणीपुरी विकणाऱ्या या खेळाडूने पाकिस्तान विरुद्ध रचला इतिहास
एका क्रिकेटरचा `यशस्वी` प्रवास
मुंबई : कधी मुंबईत पाणीपुरी विकणाऱ्या क्रिकेटरने अंडर १९ वर्ल्डकपमध्ये इतिहास रचला आहे. हा 'यशस्वी' प्रवास आहे यशस्वी जयस्वाल याचा. वर्ल्डकपमध्ये तो सर्वाधिक रन बनवणाऱ्यांच्या यादीत सध्या पहिल्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या वर्ल्डकपमध्ये त्याने कोतुकास्पद कामगिरी केली आहे. यशस्वी जयस्वालने मागच्या वर्षी विजय हजारे ट्रॉफीच्या वनडे टूर्नामेंटमध्ये दुहेरी शतक ठोकलं आहे. 50 ओव्हरच्या क्रिकेटमध्ये दुहेरी शतक ठोकणारा तो पहिला युवा खेळाडू बनला होता. अतिशय सामान्य घरातून आलेल्या यशस्वीचा प्रवास हा नक्कीच अनेकांसाठी प्रेरणा देणारा आहे.
यशस्वीने आज जे यश मिळवलं आहे. त्यासाठी त्याला खूप कष्ट करावे लागले. उत्तर प्रदेशच्या खेळाडूला ११ व्या वर्षी घर सोडावं लागलं. कारण त्याला त्याचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. तो मुंबईला आला. मुस्लीम यूनाइटेड क्लबमध्ये त्याने प्रवेश मिळवला. येथे राहणं कठीण झालं होतं. आर्थिक बाजू भक्कम नसल्यामुळे या क्रिकेटरला पाणीपुरी विकून आपला खर्च भागवावा लागत होता. पण यशस्वीची ही मेहनत त्याला फळ देऊन गेली. आज त्याने त्याच्या कामगिरीने सगळ्यांनाच प्रभावित केलं आहे.
यशस्वीने आयसीसी अंडर 19 वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत झालेल्या ५ सामन्यांमध्ये एकूण ३१२ रन केले आहेत. या वर्ल्डकपमध्ये तो सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे. पहिल्या सामन्यात ५९, दुसऱ्या सामन्यात नाबाद २९, तिसऱ्या सामन्यात नाबाद ५७, चौथ्या सामन्यात ६२ तर सेमीफायनलमध्ये पाकिस्तानच्या विरोधात त्याने नाबाद १०५ रनची खेळी केली आहे. यशस्वी आणि दिव्यांश सक्सेनाने पहिल्या विकेटसाठी नाबाद १७६ रन केले.
संबंधित बातमी: मुंबईत पाणीपुरी विकणारा भारताच्या अंडर-१९ वर्ल्ड कप टीममध्ये
मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या यशस्वीने म्हटलं की, 'हे माझासाठी एक स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे. मी माझ्या देशासाठी जे केलं त्यामुळे आनंदी आहे. मी हे शब्दात मांडू शकत नाही. मी कधीच नाही विसरणार की, मी पाकिस्तानच्या विरुद्ध वर्ल्डकपमध्ये शतक ठोकलं. ही फक्त सुरुवात आहे. भविष्यात आणखी मेहनत करायची आहे.'