क्रिकेटच्या या रेकॉर्डवर तुमचा विश्वासही बसणार नाही
क्रिकेटमधील अविश्वसनीय रेकॉर्ड
मुंबई : क्रिकेटमध्ये दररोज अनेक रेकॉर्ड बनतात आणि तुटतात. पण क्रिकेटमध्ये आजही अशी अनेक रेकॉर्ड आहेत, ज्याच्यावर तुमचा विश्वासही बसणार नाही.
१ श्रीलंकेच्या सनथ जयसूर्यानं वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाचा दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्नपेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. शेन वॉर्ननं वनडेमध्ये २९३ विकेट घेतल्यात तर जयसूर्यानं ३२३ विकेट घेतल्या.
२ २१ व्या शतकातल्या भारताविरुद्धच्या सर्वाधिक स्कोअरना ईशांत शर्मा जबाबदार आहे. एलिस्टर कूकनं २०११ साली भारताविरुद्ध २९४ रन केले. मायकल क्लार्कनं २०१२ साली भारताविरुद्ध ३२९ रनची खेळी केली आणि २०१४ साली ब्रॅण्डन मॅक्कलमनं ३०२ रन केले. ईशांत शर्मानं या तिघांचे सुरुवातीलाच कॅच सोडले होते.
३ भारताचे स्पिनर बापू नाडकर्णी यांनी १२ जानेवारी १९६४ रोजी इंग्लंडविरुद्ध चेन्नईमध्ये लागोपाठ २१ मेडन ओव्हर टाकल्या होत्या. बापू नाडकर्णींनी त्या मॅचमध्ये ३२ ओव्हरपैकी २७ ओव्हर मेडन टाकल्या. यामध्ये बापू नाडकर्णींनी फक्त ५ रन दिल्या. ०.१५ च्या इकोनॉमी रेटनं बापू नाडकर्णींनी बॉलिंग केली. १० पेक्षा जास्त ओव्हर टाकल्यानंतर एवढा कमी इकोनॉमी रेट असणारे नाडकर्णी हे आजही एकमेकव बॉलर आहेत.
४ न्यूझीलंडचा क्रिस मार्टीन आणि भारताचे बी.एस.चंद्रशेखर यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये रनपेक्षा विकेट जास्त घेतल्या आहेत. मार्टीननं ७१ टेस्टमध्ये १२३ रन केले आणि २३३ विकेट घेतल्या. चंद्रशेखर यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये १६७ रन केले आणि २४२ विकेट घेतल्या.
५ १९७५ सालच्या वर्ल्ड कप मॅचमध्ये सुनिल गावसकर यांनी १७४ बॉलमध्ये ३६ रन केले. या मॅचमध्ये इंग्लंडनं भारताला ६० ओव्हरमध्ये ३३५ रनचं आव्हान दिलं होतं. या मॅचमध्ये ओपनिंगला आलेले गावसकर नाबाद राहिले. या मॅचमध्ये भारतानं ६० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून १३२ रन केले.
६ इंग्लंडचे बॉलर जिम लेकर यांनी टेस्ट मॅचमध्ये १९ विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये लेकर यांनी ९ तर दुसऱ्या इनिंगमध्ये १० विकेट घेतल्या.
७ श्रीलंकेचा महेला जयवर्धने हा एकमेव बॅट्समन आहे ज्यानं वर्ल्ड कपच्या सेमी फायनल आणि फायनलमध्ये शतक केलं आहे.
८ वेस्ट इंडिजच्या कोर्टनी वॉल्श हे टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा नाबाद राहिलेले बॅट्समन आहेत. वॉल्श १८५ इनिंगमध्ये ६१ वेळा नाबाद राहिले.
९ लागोपाठ ४ मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच पटकावणारा सौरव गांगुली हा एकमेव खेळाडू आहे.
१० डर्क नॅनेस हा खेळाडू ऑस्ट्रेलिया आणि नेदर्लंड्सकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे.
११ पाकिस्तानच्या इंजमाम उल हकनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पहिल्या बॉलमध्येच विकेट घेतली होती.
१२ सर डॉन ब्रॅडमन यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये फक्त ६ सिक्स लगावले.
१३ वीरेंद्र सेहवागचा सर्वाधिक स्कोअर टी-२०मध्ये ११९, वनडेमध्ये २१९ आणि टेस्टमध्ये ३१९ आहे. सेहवागनं आयपीएलमध्ये ११९ रन केले होते.
१४ वसीम अक्रमचा टेस्ट क्रिकेटमधील सर्वाधिक स्कोअर सचिन तेंडुलकरपेक्षा जास्त आहे. वसिम अक्रमचा सर्वाधिक स्कोअर २५७ रन आहे. पण सचिन तेंडुलकरचा टेस्ट क्रिकेटमधील स्कोअर २४८ नाबाद आहे.
१५ इंग्लंड ही एकमेव टीम आहे जी ६० ओव्हर वर्ल्ड कप फायनल (१९७९), ५० ओव्हर वर्ल्ड कप फायनल (१९९२ आणि २००४ चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल) आणि २० ओव्हर फायनल(२०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी) या आयसीसीच्या स्पर्धांमध्ये पराभूत झाली आहे.
१६ लान्स क्लुसनर, अब्दूल रझाक, शोएब मलिक आणि हशान तिलकरत्ने यांनी वनडेमध्ये १ ते १० या सगळ्या क्रमांकावर बॅटिंग केली आहे.
१७ दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅम स्मिथ हा एकमेव खेळाडू आहे ज्यानं १०० टेस्ट मॅचमध्ये कर्णधारपद भुषवलं.
१८ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर एकदाच शून्य रनवर आऊट झाला आहे. भुवनेश्वर कुमारनं सचिनला शून्यवर आऊट केलं होतं.