सचिन तेंडुलकर पाठोपाठ यूसुफ पठाणला कोरोनाची लागण
यूसुफ पठाण आणि सचिन तेंडुलकर नुकत्याच पार पडलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज टी 20 स्पर्धेत सहभागी झाले होते.
मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा नुकताच कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर क्रिकेट विश्वातून आणखी एक बातमी समोर येत आहे. सचिन पाठोपाठ आता यूसुफ पठाणलाही कोरोना झाला आहे. या दोघांनीही रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये भाग घेतला होता. त्यामुळे आता इतर खेळाडूंची देखील चाचणी केली जाणार आहे.
टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाणचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यूसुफ पठाणने ट्वीट करून याबाबत माहिती दिली. याआधी टीम इंडियाचा स्टार खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली होती. यूसुफ पठाण आणि सचिन तेंडुलकर नुकत्याच पार पडलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज टी 20 स्पर्धेत सहभागी झाले होते.
यूसुफ पठाण सध्या आपल्या घरीच क्वारंटाईन आहेत. कोरोनाचे सौम्य लक्षण असल्यानं मी चाचणी केली. ती पॉझिटिव्ह आली आहे. रिपोर्ट आल्यानंतर मी स्वत:ला घरीच क्वारंटाइन करून घेतलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वत:ची कोरोना चाचणी करून घ्यावी असं आवाहनही त्याने यावेळी केलं आहे.
गेल्या रविवारी खेळल्या गेलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये सचिन तेंडुलकर आणि यूसुफ पठाण दोघांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे आता इतर खेळाडूंची देखील चाचणी करावी लागणार आहे. युवराज सिंह, इरफान पठान, एस बद्रीनाथ या खेळाडूंनाही कोरोनाचा धोका असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे त्यांचा कोरोना रिपोर्ट काय येतो याकडे सर्वांचं लक्ष आहे.