`तुमची `संत्रं` महिन्यातून एकदा...`, Breast Cancer बद्दल वादग्रस्त विधान; युवराज सिंग अडचणीत
Yuvraj Singh Breast Cancer Ad: सोशल मीडियावर या जाहिरातीच्या फलकाचा फोटो प्रचंड व्हायरल झाला असून अनेकांनी यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. ही जाहिरात युवराज सिंगच्या मालकीच्या संस्थेची असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
Yuvraj Singh Breast Cancer Ad: कॅन्सरवर मात करुन अनेकांचं प्रेरणास्थान ठरलेला क्रिकेटपटू युवराज सिंह वादात सापडला आहे. युवराज सिंहच्या मालकीच्या ना नफा ना तोटा तत्वावर चालणाऱ्या सेवाभावी संस्थेनं केलेल्या एका जाहिरातीवरुन वादाला तोंड फुटलं आहे. स्तनांच्या कर्करोगासंदर्भात म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सरच्या जाहिरातीमध्ये महिलांच्या स्तनांसाठी चक्क 'संत्री' हा शब्द वापरण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी ही जाहिरात असंवेदनशील असून महिलांचा अपमान करणारी असल्याचं म्हटलं आहे.
काय आहे या पोस्टवर?
युवराज सिंग यू वी कॅन (YouWeCan) नावाची सेवाभावी संस्था चालवतो. या माध्यमातून प्रामुख्याने कॅन्सरसंदर्भातील काम केलं जातं. या संस्थेच्या ताज्या जाहीरातीमध्ये एक महिला गुलाबी रंगाची साडी नेसून बसमध्ये उभी असल्याचं दिसत आहे. तिच्या समोर एका टोपलीमध्ये संत्री आहेत. या महिलेनेही तिच्या हातात दोन संत्री पकडली असून तिच्या समोर सीटवर बसलेल्या वयस्कर महिला तिच्याकडे पाहताना दिसत आहेत. या फोटो खालील मजकुरामध्ये, "Check your oranges once a month" म्हणजेच 'महिन्यातून एकदा तुमची संत्री तपासून घ्या' असं वाक्य लिहिलेलं आहे. 'लवकर निदान झालं तर जीव वाचू शकतो,' अशी ओळ त्याखाली लिहिलेली असून आहे.
हे लज्जास्पद...
या जाहिरातील दिल्लीमधील मेट्रोत लावण्यात आलेल्या आहेत. याच जाहिरातीचा फोटो शेअर करत एका व्यक्तीने कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. "ज्या देशामध्ये स्तनांच्या कॅन्सरची जाहीर करताना स्तनांचा उल्लेखही केला जात नसेल तर त्यासंदर्भात जागृती कशी करणार? ही जाहीरात दिल्ली मेट्रोत दिसली. हा काय प्रकार आहे? तुमची संत्री तपासा? ही अशी कॅम्पेन कोण करतं? कोण या जाहिरातींना परवानगी देतं? हे असे पोस्टर्स सार्वजनिक ठिकाणी जाहीरपणे झळकवण्यास परवानगी देणाऱ्या मंद लोकांकडून सारं काही चालवलं जातंय का? हे लज्जास्पद आणि लाजिरवाणं आहे," अशा शब्दांमध्ये एका व्यक्तीने या जाहीरातीचा फोटो शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे.
यावर सदर संस्थेनं किंवा युवराजने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.