आयुष्य पणाला लागलं असेल तर कोणाला बॅटींगला पाठवशील? युवराजने धोनी, विराटऐवजी घेतलं `हे` नाव
Yuvraj Singh Picks India Star: युवराज सिंग हा त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जायचा. त्याला एका मुलाखतीमध्ये एक रंजक प्रश्न विचारण्यात आला असता त्याने या प्रश्नाला दिलेलं उत्तरही तितकचं चर्चेत आहे.
Yuvraj Singh Picks India Star: भारतामधील कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांप्रमाणे तुम्ही सुद्धा क्रिकेट अगदी आवडीने पाहता का? तुम्हाला क्रिकेट चाहता म्हणून असा प्रश्न विचारला की, तुमचं आयुष्य पणाला लागलं असेल तर तुम्ही कोणाला फलंदाजीसाठी पाठवाल? या प्रश्नाला तुम्ही काय उत्तर द्याल? तुमच्यापैकी काहीजण सचिन तेंडुलकरचं नाव घेतील, काहीजण राहुल द्रविडचं नाव घेतील. अगदी सध्याच्या आयपीएलमधील सक्रीय खेळाडूंबद्दल विचारलं तर काहीजण विराट कोहलीचं नाव घेतली तर काही लोक अगदी महेंद्र सिंह धोनीचं नाव घेतील. मात्र सध्या याच प्रश्नाला युवराज सिंगने दिलेलं उत्तर चर्चेचा विषय ठरत आहे. युवराजला असाच प्रश्न विचारण्यात आलेला त्यावर त्याने त्याच्याचसारख्या शैलीत खेळणारा असं म्हणत एका क्रिकेटपटूचं नाव घेतलं असून हे नाव विराट किंवा धोनीचं नाही हे विशेष!
युवराजने कोणाचं नाव घेतलं?
'स्पोर्ट्सकीडा'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगला तुझं आयुष्य पणाला लागलं असेल तर तू कोणाला फलंदाजीला पाठवशील असा प्रश्न विचारण्यात आला. त्याप्रश्नावर युवराज सिंगने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचं नाव घेतलं. रोहित शर्माची फलंदाजीची शैली माझ्यासारखीच असल्याचंही युवराज सिंग म्हणाला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आयसीसी चषक विजयाचा 11 वर्षांचा दुष्काळ 2024 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकून संपवला. जून महिन्यामध्ये भारताने टी-20 चा वर्ल्ड कप जिंकला त्यामध्ये रोहित शर्माने मोलाची भूमिका बजावली. रोहित शर्माने एकूण 8 सामन्यांमध्ये एकूण 251 धावा केल्या. त्याने 36.71 च्या सरसारीने धावा केल्या. त्यामुळेच युवराजने रोहितचं नाव घेतल्याचं स्पष्ट आहे.
युवराज नेमकं काय म्हणाला?
"माझ्या बॅटींग स्टाइलबद्दल बोलायचं झालं तर नेमकं कोणाचं नाव घ्यावं तर मी माझ्या पेक्षा मोठे फटके मारण्याचं नाव घेईन, ते नाव म्हणजे रोहित शर्मा," असं युवराज म्हणाला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीच भारतीय संघ 18 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध चेन्नईमध्ये कसोटी सामना खेळणार असून शुक्रवारपासूनच भारतीय संघाने एम. ए. चेन्नस्वामी स्टेडियममध्ये सरावाला सुरुवात केली आहे. रोहितबरोबरच संघाच्या बसमध्ये जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, के. एल. राहुलसारखे खेळाडूही दिसून आले. विराट कोहली सुद्धा लंडनवरुन थेट चेन्नईमध्ये सरावासाठी दाखल झाला आहे. दुसरीकडे वेगवान गोलंदाज आकाश दीप, यश दयार यांना सुद्धा कसोटी संघात स्थान देण्यात आलं आहे. तर दुसरीकडे डिसेंबर 2022 मध्ये भीषण अपघात झाल्यानंतर त्यामधून सावरलेला ऋषभ पंत पहिल्यांदाच दिर्घ फॉरमॅटमध्ये मैदानात उतरलेला पाहायला मिळणार आहे.